ठाणे : एचडीएफसी बँकेचे बेपत्ता अधिकारी सिद्धार्थ संघवी यांचा मृतदेह कल्याणमध्ये सापडला आहे. कल्याणमधील हाजी मलंग रोडवर काकडवाल गावाजवळ रस्त्याच्या कडेला कुजलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला. बँकेच्या उपाध्यक्षपदी वयाच्या 37व्या वर्षीच बढती मिळाल्याच्या ईर्षेतून एका सहकाऱ्याने संघवी यांची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले होते. तसेच ठाणे जिल्ह्यात निर्जन स्थळी त्यांचा मृतदेह फेकल्याची माहिती मारेकऱ्यांनी पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांची पथके रवाना झाली होती. त्यानंतर करण्यात आलेल्या तपासामध्ये सिद्धार्थ संघवी यांचा मृतदेह सापडला आहे.
मलबार हिल येथील रहिवासी असलेले संघवी हे कमला मिलमध्ये एचडीएफसीच्या बँकेच्या कार्यालयात कार्यरत होते. 5 सप्टेंबरला रात्री दैनंदिन काम संपवून ते निघाले. मात्र, ते घरी न परतल्याने कुटुंबीयांनी 6 सप्टेंबरला तक्रार दिली. शुक्रवारी कोपरखैरणेच्या सेक्टर 19 मध्ये त्यांची कार सापडली. त्यामध्ये रक्ताचे डाग, तसेच चाकू आढळून आला. रविवारी नवी मुंबईच्या गुन्हे शाखेने सरफराज शेख या तरुणाला ताब्यात घेतले. त्याने हत्येची कबुली दिली.
संघवी काम संपवून कार घेण्यासाठी पार्किंग लॉटमध्ये गेले. तेथेच दबा धरून असलेल्या मारेकऱ्यांनी चाकूने वार करत त्यांची हत्या केली. रात्री सव्वाअकराच्या सुमारास त्यांची गाडी परळच्या धनमिल नाका परिसरातून जाताना दिसली. त्यामुळे तब्बल दोन ते तीन तास कमला मिलच्या पाचमजली पार्किंग लॉटमध्येच हत्याकांडाचा थरार घडला, अशी शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. संघवींना नुकतीच बढती देण्यात आली होती. आपल्याला डावलून संघवींना बढती देण्यात आल्याचा राग एका सहकाऱ्याच्या मनात होता. त्यानेच संघवी यांचा काटा काढण्यासाठी त्यांच्या हत्येची सुपारी दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.