लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील पात्र असलेल्या शेतकऱ्यांपैकी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत १५ हजार ८०१ शेतकऱ्यांची खाती आहेत, तर इतर बँकांमध्ये ३३९ शेतकऱ्यांचे खाते आहे. या सुमारे १६ हजार १४० शेतकऱ्यांच्या बँक खात्यांचे गाव, संस्थानिहाय प्राप्त याद्यांचे आधार प्रमाणिकरण करून त्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ झाला आहे. यामुळे बँका पीककर्ज वाटपात यंदाही मेहरबान झाल्या असल्याचे शेतकऱ्यांकडून ऐकायला मिळत आहे.
या योजनेच्या पहिल्या दिवशी दोन हजार ८२६ शेतकऱ्यांची बँक खाती आधारकार्ड लिंक करून या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १७ कोटी ४६ लाख ९२ हजार रुपये ३ मार्च २०२० ला जमा करण्याचा विक्रम जिल्ह्यात संबंधित प्रशासनाने केला होता. उर्वरित अन्यही पात्र शेतकऱ्यांना अल्पावधीतच या योजनेद्वारे दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमुक्ती योजनेचा लाभ सुरळीतपणे दिल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
या कर्जमाफीच्या रकमेसंबंधी प्राप्त तक्रारी सोडविण्यासाठी विविध पातळ्यांवर समित्या गठीत केल्या होत्या. या तक्रारींमध्ये अंगठ्याचा ठसा उमटत नसलेल्या तक्रारी अधिक होत्या. त्या संबंधित स्थानिक तहसीलदारांना प्राप्त होताच त्यावर लगेच निर्णय घेऊन शेतकऱ्यांना लाभ देणे शक्य झाले आहे. या योजनेद्वारे चाळीस हजारांचे कर्ज माफ झाल्याचे शहापूर तालुक्यातील वाशाळा येथील शेतकरी पांडुरंग धानके यांनी स्पष्ट करून शासनाचे आभार मानले, तर ६५ हजारांचे कर्ज माफ झाल्याचे नायकाचापाडा येथील राम आवार यांनी मान्य केले.
........