उल्हासनगर : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भावी मुख्यमंत्री अजित पवार असे बॅनर्स झळकल्याने, चर्चेला उधाण आले. राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते रोहित गमलाडू यांच्यासह तिघांचे फोटो बॅनर्सवर शुभेछुक म्हणून आहेत.
उल्हासनगर राष्ट्रवादी पक्षाच्या शहरजिल्हाध्यक्ष पदी पंचम कलानी यांची निवड झाल्यावर, राष्ट्रवादीला पुन्हा बरे दिवस आले. शहरातील राजकारण तब्बल तीन दशकापासून माजी आमदार पप्पु कलानी यांच्या भोवती फिरत आहे. कलानी हे पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे कट्टर समर्थक असून जिल्ह्यातील वजनदार नेते जितेंद्र आव्हाड यांच्या सोबत कलानी कुटुंबाचे घरगुती संबंध असल्याचे चित्र आहे. राज्यातील इतर शहरात पक्षाचे नेते अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स झळकले. त्याच धर्तीवर छत्रपती शिवाजी महाराज चौकात बॅनर्स झळकल्याने, शहरात चर्चेला उधाण आले. बॅनर्सवर शुभेछूक म्हणून रोहित गमलाडू यांच्यासह तिघांचे फोटो झळकले आहे. राज्यात अजित पवार हेच मुख्यमंत्री पदाचे मुख्य दावेदार असून तेच राज्याला व पक्षाला खरा न्याय देतील. अशी प्रतिक्रिया गमलाडू यांनी पत्रकारा सोबत बोलतांना दिली.
कॅम्प नं-३ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांच्या नावाने बॅनर्स झळकल्याने, सर्वत्र चर्चा होत आहे. अश्या वेळी कलानी कुटुंबाकडून काहीएक प्रतिक्रिया न आल्याने, राष्ट्रवादीत पक्षात कुरघोडी तर नाही ना? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. शहर राष्ट्रवादीत कलानी व गंगोत्री असे दोन गट असून शहर पूर्वेत गंगोत्री तर पश्चिमेस कलानी पॅटर्न चालणार असल्याचे बोलले जात आहे.