सदानंद नाईक, उल्हासनगर: रस्त्यातील खड्ड्यातून बाप्पाचे आगमन होत असताना दुसरीकडे महापालिकेत शुक्रवारी बाप्पा अवतरले. गणेशोत्सवापूर्वी रस्त्यातील खड्डे भरण्यात यावे यासाठी बाप्पाने महापालिका आयुक्त अजीज शेख यांना निवेदन दिले. यावेळी मनसेचे मनोज शेलार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
उल्हासनगर रस्त्यातील गणेशोत्सवापूर्वी खड्डे भरण्याचे आश्वासन महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी दिले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाला सुरुवात झाल्याने, खड्डे भरण्याच्या कामाला अडथळा निर्माण झाला. रस्त्यात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने, ऐन गणेशोत्सव काळात अपघात होण्याची शक्यता मनसेचे मनोज शेलार यांनी व्यक्त केली. तसेच रस्त्यातील खड्डे भरण्यासाठी महापालिकेला वारंवार निवेदन दिले होते. मात्र त्याकडे महापालिका बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप मनसेने केला. गणपती मिरवणुकी दरम्यान खड्ड्यामुळे एखादी दुर्घटना झाल्यास किंवा गणपती मुर्तीची विटंबना झाल्यास त्याला महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप मनोज शेलार यांनी निवेदनाद्वारे केला आहे.
महापालिका प्रशासनाला रस्त्यातील खड्ड्या बाबत जाब विचारण्यासाठी मनोज शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली गणपती बाप्पाचा वेश परिधान करत सचिन चौधरी, गणेश आठवले, प्रेम मोकाशी, अशोक गरड, संदीप गरड, सुनील शेलार, विकी शेलार, मनोज हाथी, देवा कुमावत गेले होते. महापालिका आयुक्त अजीज शेख यांची भेट घेत त्यांना निवेदन सादर केले. यावेळी आयुक्तांनी गणेशोत्सवापुर्वी युद्धपातळीवर शहरातील खड्डे भरण्याचे काम सुरु करण्यात येणार असल्याचे आश्वासन देऊन तसे आदेश बांधकाम विभागाला दिले. गणेशोत्सव दरम्यान रस्ते चकाचक होतात का? याकडे सर्वसामान्य नागरिकांचे। लक्ष राहिले आहे.