शहापूर : माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी शुक्रवारी तालुक्यातील संभाव्य टंचाईग्रस्त गावांची पाहणी केली. तालुक्याची कायमस्वरूपी पाणीटंचाई दूर होण्यासाठी भावली योजना मंजूर झाली असली तरी प्रत्यक्षात योजनेतून पाणी येण्यासाठी दोन वर्षे लागणार आहेत.
मार्च महिना सुरू झाली की, पाणीटंचाई निर्माण होते. कसारा,खर्डी, वाशाळा या भागातील विहिरींनी तळ गाठल्यामुळे टँकरची मागणी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कसारा-वाशाळा या भागातील ओहळाचीवाडी, चिंतामणवाडी, दांड, उभरवणे, नारळवाडी, पारधवाडी, बिबलवाडी, विहिगाव, माळ, वाशाळा, टोकरखांड, फुगाळे व आघाणवाडी या टंचाईग्रस्त गावांचा पाहणी दौरा केला.
या दौऱ्याच्या वेळी सभापती रेश्मा मेमाणे, उपसभापती जगन पष्टे, पंचायत समिती सदस्य प्रकाश वीर, एकनाथ भला, संदीप थोराड, पं.स. सदस्या यशोदा आवटे, संदीप भांगले, काशीनाथ मांगे, किसन मांगे, दुर्वास निरगुडे, विलास धानके, संपत धानके, भाऊ धानके, बबन केवारी तसेच पंचायत समितीचे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी सोबत होते.
दौऱ्यानंतर लगेचच संबंधित पाणीपुरवठा विभागाला अस्तित्वात असलेल्या पाणी योजना दुरुस्ती करणे तसेच बोअरवेल दुरुस्ती करण्याच्या तसेच आवश्यक ठिकाणी दोन दिवसात टँकरने पाणीपुरवठा करावा, अशा सूचना केल्या.