ठाणे - मिशन बिगेन अंतर्गत ५ ऑक्टोबर पासून शहरातील हॉटेल, बार, रेस्टॉरेन्ट सकाळी ९ ते सांयकाळी ७ वाजेर्पयत सुरु करण्यात आली. परंतु शहरातील हॉटेल, बार असोसिएशनने केलेल्या मागणीनंतर आता ठाणे महापालिकेने १० ऑक्टोबर सकाळी ७ ते रात्री ११.३० वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता चल रे बसू असे म्हणत मद्यपींची यामुळे चंगळ होणार आहे. परंतु हॉटस्पॉटमध्ये मात्र ही परवानगी नाकारण्यात आली आहे.शहरातील हॉटेल, बार, फुडकोर्ट, रेस्टॉरेन्ट हे ५ ऑक्टोबर पासून सुरु झाले होते. परंतु ठाण्यातील केवळ १० टक्केच बार या दिवशी सुरु झाले होते. तसेच या हॉटेल आणि बारवाल्यांचा खरा व्यावसाय हा सांयकाळी ७ नंतर सुरु होत आहे. त्यामुळे त्यानुसार बार असोसिएशनने या बाबत जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर शिष्ठ मंडळाने महापालिका आयुक्तांची देखील भेट घेतली होती. या भेटीनंतर आता १० ऑक्टोबर पासून हॉटेल, बार यांच्या वेळांमध्ये बदल करण्यात येत असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. महापालिकेने या संदर्भातील आदेश काढला आहे. त्याची अंमलबजावणी आता आजपासूनच होणार असल्याचे या आदेशात नमुद करण्यात आले आहे. त्यानुसार आता ठाण्यातील हॉटेल, बार, रेस्टॉरेन्ट आज पासून सकाळी ७ ते रात्री ११.३० र्पयत सुरु राहणार आहेत.यामध्ये ठाण्यातील १८ हॉटस्पॉटमधील बंधने आजही कायम ठेवण्यात आली आहेत. त्यानुसार या हॉटस्पॉटमधील हॉटेल, बार, रेस्टॉरेन्ट सुरु ठेवली जाणार नसल्याचेही पालिकेने स्पष्ट केले. परंतु तरी देखील हॉटस्पॉटमध्ये हॉटेल, बार सुरु असल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही पालिकेने या आदेशात दिला आहे.
ठाण्यातील बार आणि रेस्टॉरेन्ट्स रात्री ११.३० पर्यंत राहणार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2020 8:01 PM