ठाणे : जिल्ह्यातील सहा मनपा, नगप परिषद, उद्योगधंदे, कारखाने आणि गांवपाड्यांना पाणी पुरवठा करणारे बारवी धरण बुधवारी रात्री १०० टक्के भरले. गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल आठ दिवस उशिरा ८ सप्टेंबरला धरण भरले. या धरणाचे स्वयंचलित आठ दरवाजे उघडल्या गेले आहेत. या दरवाज्यातून पर सेकंदाला ७०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील पाणी समस्या, कपातीचे संकट मिटले आहे.
जिल्ह्यात यंदा पावसाचा कहर होऊन जनजीवन विस्कळीत झाले. तरीही धरण मात्र आठ दिवस उशिराने भरले. या दरम्यान बारवी धरणाच्या पाणलोटात कमी पाऊस पडल्यामुळे धरण भरण्यास विलंब झाला. धरण आता पूर्ण क्षमतेने भरले आहे. आता या धरणात ३३३.५१ दशलक्ष घनमीटर पाणी साठा तयार झाला आहे.
या धरणात आजपर्यंत सरासरी २११२ मिमी पाऊस पडला आहे. या धरणाच्या खानिवरे या पाणलोटात आजपर्यंत सरासरी २८९७ मिमी पाऊस पडला आहे. कान्होळला २२९१ मिमी, पाटगांवला २१६५ मिमी आणि ठाकूरवाडी या पाणलोटात २५२३ मिमी.सरासरी पाऊस पडलेला आहे. यामुळे धरणांतील पाणीसाठा १०० टक्के झाला आहे.