बदलापूर: संपूर्ण ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारे बारवी धारण 100 टक्के भरले असून या धरणाचे आठ स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. या धरणातून आता पाण्याचा विसर्ग सुरू झाला असून धरणा खालील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
अंबरनाथ आणि मुरबाड तालुक्याच्या मध्यावर असलेल्या बारवी धरणातून संपूर्ण ठाणे जिल्हासह औद्योगिक वसाहतींना पाणीपुरवठा केला जातो. या धरणाची उंची वाढवल्यानंतर या धरणाच्या पाणी क्षमते दुपटीने वाढ झाली. गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हे धरण पूर्ण क्षमतेने भरले असून आज दुपारी बारा वाजताच्या दरम्यान धरणातील 11 पैकी आठ स्वयंचलित दरवाजे उघडले गेले आहेत. धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. धरणामध्ये ७२.६० मीटर एवढी पाण्याची पातळी झाल्यास धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले जातात.
आज दुपारी बारा वाजताच्या दरम्यान धरणाने आपल्या क्षमतेची पातळी गाठली असून आता पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. बारवी धरण भरल्याने अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, ठाणे, भिवंडी आणि ठाणे जिल्ह्यातील एमआयडीसी यांचा पाणी प्रश्न कायमचा मार्गील निघाला आहे. सध्य स्थितीत धरणात 342 एमसीएम एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी हे धरण भरल्याने भविष्याची पाण्याची समस्या वर्षभरासाठी निकाली निघणार आहे.