बदलापूर : बारवी धरणाची उंची वाढल्यानंतर त्या धरणात अजूनही क्षमतेएवढे पाणी साठवण्यात आले नव्हते. पुनर्वसनाचा प्रश्न निकाली न निघाल्याने दरवाजांचे काम रखडले होते. मात्र, गेल्या वर्षभरात पुनर्वसनाचे काम अंतिम टप्प्यात आल्याने आता बारवी धरणाचे दरवाजे हे या वर्षात बंद होणार, हे निश्चित झाले आहे. त्यामुळे या दरवाजांची चाचणी आमदार किसन कथोरे आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी केली आहे.अंबरनाथ आणि मुरबाड तालुक्यांच्या मध्यावरील बारवी धरण हे एमआयडीसीच्या अखत्यारितील धरण असून या धरणातून संपूर्ण ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा केला जाणार आहे. ६५.१५ मीटर उंचीच्या या धरणात १७२ दशलक्ष घनमीटर इतकी पाण्याची क्षमता होती. आता नव्याने धरणाची उंची नऊ मीटरने वाढवल्याने हीच क्षमता दुप्पट झाली असून आता धरणात ३४०.४८ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा राहणार आहे. धरणाच्या उंचीच्या वाढीसोबत आता धरणातील ११ स्वयंचलित दरवाजांचे कामही पूर्ण झाले आहे. मात्र, धरणात क्षमतेएवढे पाणी साठवणे अवघड जात होते. धरणाच्या पाणलोटक्षेत्रातील गावांनी स्थलांतराला विरोध केला होता.पुनर्वसन पॅकेज, नोकरी आणि घरांच्या मोबदल्यात भरपाई या विषयांवर सातत्याने वाद सुरू होता. आता एमआयडीसीनेही या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा निर्णय घेतला आहे. मुरबाड तालुक्यातील तोंडली, काचकोली, कोळे-वडखळ आणि मोहघर येथील १२०४ कुटुंबांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नावरून धरणाची उंची नऊ मीटरने वाढूनही अतिरिक्त पाणीसाठा करता येत नव्हता. मात्र, गेल्या वर्षभरात शेकडो कुटुंबे त्यांना दिलेल्या जागेत स्थलांतरित झाली आहेत.३४० दशलक्ष घनमीटर पाणी साठवणारयंदा धरणात ३४० दशलक्ष घनमीटर पाणी साठवण्यासाठी ११ दरवाजे बंद करण्यात येणार आहे. मात्र, धरण भरल्यावर हे दरवाजे उघडता यावे, यासाठी त्याची चाचणी करण्यात आली. हे दरवाजे स्वयंचलित असून वेळेवर हायड्रोलिक पद्धतीचाही अवलंब करता येणार आहे. या चाचणीत दरवाजांची उघडझाप पडताळण्यात आली. यावेळी आमदार कथोरे यांनीही यंत्रणेची माहिती घेतली. यंदाच्या वर्षात दरवाजे बंद करून धरणात साठा निर्माण केला जाणार आहे.
बारवीचे दरवाजे बंद; जिल्ह्याचा पाणीप्रश्न सुटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 11:09 PM