मुरबाड : ठाणे जिल्ह्याची पाण्याची तहान भागवणाऱ्या बारवी धरणाची उंची वाढवण्याचे काम लवकरच पूर्ण होणार असून तालुक्यातील प्रकल्पग्रस्त असलेल्या १७४ व्यक्तींना शासकीय सेवेत नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाणे जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. या उंचीवाढीमुळे धरणातील पाणीसाठा दुप्पट होणार आहे.
कल्याण डोंबिवलीसह भिवंडी, मीरा - भार्इंदर, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, ठाणे, नवीमुंबईचा काही भाग, मुरबाड आदी शहरांना पाणीपुरवठा करणाºया मुरबाड तालुक्यातील बारवी नदीवरील बारवी धरणाचे पाणी वाढत्या लोकसंख्येला अपूरे पडू लागले. या धरणाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आणि उंची वाढीचे काम पूर्णत्त्वास आले देखील. मात्र, यामुळे तोंडली, काचकोली, मोहघर आदी गावपाड्यांमधील अनेक शेतकºयांच्या जमिनी बाधित झाल्या.
प्रकल्पग्रस्त शेतकºयांच्या पुनर्वसनाचे काम सुरू असून ठाणे जिल्हा नियोजन समितीने प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. सुमारे १९१ नावांपैकी १७४ व्यक्तींची नावे अंतिम करण्यात आली आहेत. याबद्दल हरकती तसेच सूचना मागवण्यात आल्या आहेत. एका कुटुंबाचे चार भाग झाल्याचे दाखवून प्रत्येकी एकाला नोकरी मिळावी अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली होती. परंतु, त्यास नकार देऊन कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती सांगेल त्याला नोकरी देण्यात येणार आहे. अशा प्रकारची १७४ नावांची अंतिम यादी तयार करण्यात आली आहे.कोळे गावातील जमीन ही वनखात्याची असून ती मिळवण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे या गावातील पुनर्वसन अद्याप रखडले आहे. तर तोंडली येथील गावकºयांनी जमिनीच्या मोबदल्यात रोख पैशांची मागणी केली असून त्या बाबतचा निर्णय या महिना अखेरीस होणाºया बोर्ड मिटींगमध्ये होण्याची अपेक्षा आहे. सासणे गावाजवळ पुनर्वसन करण्यासाठी शेडचे कामही प्रगती पथावर आहे.
बारवी धरणीची उंची वाढविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून वक्र दरवाजेही आले आहेत. मात्र, प्रकल्पग्रस्तांचे संपूर्ण पुनर्वसन झाल्याशिवाय दरवाजे बसवता येत नाही.धरणाची ऊंची ३ मीटरने वाढवण्यात आल्याने पाणीसाठा ४० टक्क्यांनी वाढला आहे. काम पूर्ण झाल्यानंतर पाणीसाठा दुप्पट होणार आहे. त्याच प्रमाणे वीजनिर्मिती करणे देखील शक्य होणार आहे.