अंबरनाथ : बारवी विस्तारीकरणात विस्थापित झालेल्या तळ्याची वाडी, देवराळ वाडी आणि कोळे वडखळ येथील ग्रामस्थांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. त्यामुळे या तीन गावांतील ग्रामस्थांनी बुधवारपासून अंबरनाथ येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या मुख्यालयाबाहेर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. सायंकाळपर्यंत या आंदोलकांशी एमआयडीसी अधिकाऱ्यांची चर्चा सुरू होती. मात्र चर्चेची पहिली फेरी निष्फळ ठरली आहे.
बारवी धरणाच्या विस्तारीकरणाचा तिसरा टप्पा २०१९ मध्ये पूर्ण झाला असून त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील शहरांना अतिरिक्त पाणी उपलब्ध झाले आहे. मात्र धरणामुळे विस्थापित झालेल्या कोळे वडखळ, तळ्याची वाडी आणि देवराळवाडी या गावातील ग्रामस्थांचे पुनर्वसन अद्याप पूर्ण झालेले नाही. वडखळ येथील ग्रामस्थांना त्यांच्या सोयीच्या ठिकाणी पुनर्वसन करण्यास एमआयडीसी प्रशासनाने नकार दिला आहे. तळ्याची वाडी आणि देवराळवाडी या गावांचे नाव धरणग्रस्त म्हणून एमआयडीसी प्रशासनाच्या लेखीसुद्धा नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थांना धरणाच्या विस्तारीकरणामुळे वाढलेल्या पाण्याचा फटका बसत असून ग्रामस्थ पाण्याने तीन बाजूंनी वेढले जात आहेत. चौथ्या बाजूला जंगल असल्याने त्यातून त्यांना मार्ग काढावा लागतो आहे. त्यामुळे पुनर्वसनाच्या मागणीसाठी बुधवारपासून या तीन गावांतील ग्रामस्थांनी श्रमिक मुक्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली अंबरनाथच्या एमआयडीसी मुख्यालयाबाहेर बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात केली. या वेळी ग्रामस्थ विविध गाणी गात एमआयडीसी प्रशासनाचा निषेध करताना दिसले. आंदोलनावेळी अंबरनाथ पोलिसांचा चोख पोलीस बंदोबस्त पाहायला मिळाला. एमआयडीसी त्यांना मुख्यालयात प्रवेश दिला नाही.
तयारीनिशी उतरले आंदोलनातपुनर्वसनाच्या मागणीसाठी मुरबाड तालुक्यातील कोळे वडखळ, तळ्याची वाडी आणि देवराळ वाडी या गावांतून सुमारे अडीचशे गावकरी ठिय्या आंदोलनासाठी अंबरनाथमध्ये आले आहेत. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि महिला या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत. ग्रामस्थ पुढच्या काही दिवसांची तयारी करूनच आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत.