अनगाव : शहापूर तालुक्यातील भातसा नदी असलेल्या वासिंद गावाजवळील धनिक ग्रामपंचायत असलेल्या खातिवली ग्रामपंचायत हद्दीतील डोंगरपाड्यातील विहिरीने तळ गाठल्याने येथील आदिवासीपाड्यावर सध्या भीषण पाणीटंचाई सुरू आहे. पंचायत हद्दीत असलेल्या आदिवासी डोंगरपाडा येथील आदिवासींसाठी एकमेव विहीर तसेच बोअरवेल आहे.
आदिवासींना वर्षभर पाण्यासाठी या तुटपुंज्या व्यवस्थेवर अवलंबून राहावे लागते. ग्रामपंचायत प्रशासनाकडून या कुटुंबीयांना कायमस्वरूपी पाणी देण्याची कोणतीही तरतूद आजपर्यंत होत नसल्याने येथील ग्रामस्थांमध्ये संताप आहे. सध्या विहिरींचे पाणी आटले असून बोअरवेलचे पाणीदेखील तळाला गेले असल्याने खातिवली ग्रामपंचायतीतर्फे टँकरने पाणीपुरवठा करण्याचे काम सुरू केले आहे. योजना सुरू ठेवणे, ही ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे. तांत्रिक अडचणी असल्यास आम्ही सहकार्य करू, असे उपकार्यकारी अभियंता एम.बी. आव्हाड, पाणीपुरवठा विभाग, पं.स. शहापूर यांनी सांगितले.शहापूर तालुक्यातील अनेक गावपाड्यातील विहिरींनी तळ गाठल्याने नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामाना करावा लागत आहे. प्रसंगी खड्ड्यातील दूषित पाणी पिण्याची वेळही या ग्रामस्थांवर आली आहे. प्रशासनाने अनेक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू केला असला तरी अद्यापही काही भागात टँकर पोहचलेला नाही असे ग्रामस्थांनी सांगितले.
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजूषा जाधव यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पाणीपुरवठा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे पाणी मिळेल अशी आशा आदिवासी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. पाण्यासाठी आमची वणवण थांबवा अशी विनंती महिलांनी ‘लोकमत’शी बोलताना केली. रणरणच्या उन्हात ग्रामस्थांना पाणी भरण्यासाठी जावे लागत आहे.
३७ लाखांची योजना झाली होती मंजूर२००६-०७ ला आदिवासी उपयोजनेतून खातिवली येथील फणसीपाडा, डोंगरपाडा, मोरावणेपाडा आणि कातकरीवाडी या आदिवासी वस्तीसाठी ३७ लाखांची नळपाणीयोजना मंजूर करण्यात आली होती. पुढे ती योजना कधीही पूर्णत्वास गेली नसल्याचे कागदोपत्री दिसते.- देविदास जाधव, माजी उपसरपंच तथा सदस्य, ग्रामपंचायत, खातिवली