मीरा रोड - बनावट बिलच्या आधारे नकली सोन्याचा दागिना विकण्यासाठी आलेल्या चौकडीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. मीरा रोडच्या हाटकेश भागातील अभूषण गोल्ड नावाचे दुकान गोपाल प्रजापती या सराफाचे आहे. त्याच्याकडे दोघे जण सोन्याचे सुमारे ३२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट विकायचे आहे म्हणून आले.दुकानदाराने बिल विचारले असता त्याने रमेश भाटी या नावाने असलेले भवानी ज्वेलर्सचे बिल दिले. ७० हजार रुपयांत विक्रीचा व्यव्हार नक्की झाला. परंतु सराफास संशय आल्याने त्याने आज पैसे नसल्याने उद्या येण्यास सांगितले. त्याने ब्रेसलेटची तपासणी केली असता ते नकली निघाले.प्रजापती याने ज्वेलर्स असोसिएशनच्या पदाधिका-यांशी संपर्क साधला असता अशा प्रकारे बनावट बिल दाखवून नकली दागिने विक्री करणारी टोळी कार्यरत असल्याचे लक्षात आले. पदाधिका-यांनी सापळा रचला. दुस-या दिवशी एका कारमधून चौघे जण आले. त्यातील दोघांनी दुकानात जाऊन ब्रेसलेटच्या पैशांची मागणी केली. दुकानदाराने ते नकली असल्याचे सांगितले असता त्यांनी बळजबरी त्यास बाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये कोंबले. त्याच वेळी दबा धरून असलेल्या पदाधिका-यांनी धाव घेतली असता ते चौघे दुकानदारास सोडून पळून गेले.सदर प्रकार स्थानिक गुन्हे शाखेच्या कानावर घातला असता पोलीस पथकाने चौघांना दीपक रुग्णालय भागातून अटक केली. रमेश अर्जुन भारती, गोवाराम विरमाराम देवासी, नेमाराम जीवाराम चौधरी व भरत संतोष गीरी अशी चौघा अटक आरोपींची नावं असून ते भार्इंदरच्या महात्मा फुले ( केबिन रोड ) मार्गावर राहणारे आहेत. मीरा-भार्इंदरमधील ६ ते ७ तर नायगावमधील २ सराफांना देखील अशा प्रकारे बनावट बिलच्या आधारे बनावट दागिने विकून गंडवण्यात आल्याच्या घटना घडल्या असल्याचे असोसिएशनचे म्हणणे आहे.
बनावट बिलाच्या आधारे नकली दागिने विकणारी चौकडी अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2018 8:00 PM