भातसानगर : भातसानगर येथील एका कार्यालयात दिव्यांग व्यक्तीस कंत्राटदारी पद्धतीने कामावर ठेवून त्याच्या कुटुंबाला मोठा आधार दिल्याने कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे.कोणी कुणाला किती आणि कशी मदत करायची हे त्या परिस्थितीला अनुसरूनच करावी आणि तसे केल्यास त्याचे आपल्यालाही समाधान मिळते आणि पुण्यही! जणू असेच काम भातसानगर येथील एका कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी केल्याने त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. बिरवाडी येथील ३५ वर्षीय तरुण सावळाराम गाडेकर लहानपणापासूनच दिव्यांग. त्यातच वयस्कर आई, मोठा भाऊ कामानिमित्त बाहेरच, बहिणीचे लग्न झाले आहे. लहानशा घरात तो आणि आई असे दोघेच त्या घरामध्ये राहतात. दिवस उजाडला की केवळ एका हाताने माती आणायची आणि आपल्या आईकडे मडकी करण्यासाठी द्यायचा. मात्र हे किती दिवस एका कोपऱ्यात बसावे आणि आपल्या दिव्यांग हातापायांकडे पाहत बसायचे. कुठेही काम नाही आणि काम असले तरी शरीराची साथ नाही. मात्र ही परिस्थिती ‘लोकमत’ प्रतिनिधीने भातसानगर येथील जलसंपदा विभागाच्या भातसा धरण उपविभाग क्रमांक १(क)मधील अधिकारी श्याम हंबीर यांच्या कानावर घातली. त्याच वेळी या कार्यालयात कंत्राटदारी पद्धतीने कामावर घ्यायचे होते. हंबीर यांनी पुढाकार घेत उपकार्यकारी अभियंता मनोज पांडेय, राहुल पारेख, गणेश कचरे, समीर तडवी यांच्या मदतीने त्यास सफाई कामगार म्हणून कामावर घेतले. त्यामुळे आज त्याच्या म्हाताऱ्या आईला मोठा आधार मिळाला असून मायलेकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे.
आज आठ महिन्यांनंतर सावळाराम याने कार्यालयातील सर्वांना आपलेसे केले आहे. आपल्याला आज जो पगार मिळतो तो खूप समाधान देऊन जातो. शिवाय या कार्यालयातील प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी देवासमान असल्याचे तो आवर्जून सांगतो. शिवाय आपण जोपर्यंत या कार्यालयात आहोत तोपर्यंत मी त्याला उद्या जरी काम मिळाले नाही तरी आज मिळतो त्यापैकी अर्धा पगार मी देणार, तर कार्यालयातील इतर कर्मचारी मिळून अर्धा पगार देऊन त्याचा आपण उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवू, असा ठाम विश्वास उपकार्यकारी अभियंता पांडेय यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे या कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे.