सदानंद नाईक उल्हासनगर : राणा डॉम्पिंग ग्राऊंड परिसरातील अवैध बांधकामावर सहायक आयुक्त अनिल खतूरानी यांच्या पथकाने बुधवारी पाडकाम कारवाई केली. दरम्यान उपायुक्त मदन सोंडे यांनी प्रभाग अधिकाऱ्याकडून मागविलेल्या अवैध बांधकामाची यादी आदेशाला केराची टोपली दाखविल्याची टीका होत आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-२ राणा डॉम्पिंग ग्राऊंड परिसरातील खुल्या जागेवर अवैध बांधकाम सुरू असल्याच्या तक्रारी सहायक आयुक्त अजय खतूरानी यांना मिळाली. बुधवारी दुपारी अवैध बांधकामावर खतुरानी यांच्या पथकाने पाडकाम कारवाई केली. तसेच प्रभाग समिती क्रं-२ मधील अवैध बांधकामावर पाडकाम कारवाईचे संकेत दिले. एकीकडे सहायक आयुक्त अजय खतूरानी प्रभाग समिती क्रं-२ मधील अवैध बांधकामावर कारवाई करीत असताना, इतर प्रभाग समितीचे प्रभाग अधिकारी अवैध बांधकामावर कारवाई का करीत नाही? असा प्रश्न नागरिकांना पडला. प्रभाग समिती क्रं-१, ३ व ४ मध्ये असंख्य अवैध बांधकामे सुरू असून महापालिका पाडकाम कारवाई कधी करणार? असी टीका होत आहे. पाडकाम कारवाईला राजकिय दबाव येत असून ज्या प्रभागात अवैध बांधकामे होत आहेत. शहर विकासासाठी प्रभागातील नगरसेवकांनी अवैध बांधकाम पाडकाम कारवाईसाठी पुढाकार घ्यावा. अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
शहरातील अवैध बांधकामाच्या तक्रारी वाढल्याची दखल आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी घेत अतिक्रमण विभाग प्रमुखांची पद रद्द केले. तसेच अवैध बांधकामाची जबाबदारी संबंधित प्रभाग अधिकाऱ्याचे असल्याचे आदेश काढुन, बांधकामाची यादी उपायुक्त यांना देण्याचे आदेश दिले. मात्र आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवीत अद्याप पर्यंत अवैध बांधकामाची यादी उपयुक्तांना प्रभाग अधिकाऱ्यांनी दिली नाही. अखेर उपायुक्त मदन सोंडे यांनी प्रभाग अधिकारी अजय एडके, अजय खतुरानी, अजित गोवारी व तुषार सोनावणे यांना आपापल्या प्रभागातील अवैध बांधकामाची यादी मागविली. मात्र उपायुक्तांच्या आदेशानंतरही प्रभाग अधिकाऱ्यांनी अवैध बांधकामाची यादी दिली नसल्याचे उघड झाले.
अवैध बांधकामावर कारवाई अटळ
शहरातील अवैध बांधकामाची यादी प्रभाग अधिकारी यांना मागितली आहे. अवैध बांधकामाच्या याद्या आल्यानंतर, पाडकाम कारवाई अटळ असल्याचे संकेत उपायुक्त मदन सोंडे यांनी दिली. तसेच प्रभाग अधिकारी यांच्या बदलीचे अप्रत्यक्ष संकेत दिले.