कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील अनेक अधिकारी एकाच विभागात वर्षानुवर्षे कार्यरत आहेत. संबंधित विभागातील अर्थकारणामुळे त्यांच्या बदल्यांना फाटा दिला जातो. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या कधी होणार, असा सवाल केला जात आहे. दरम्यान, महापालिका आयुक्तांनीही अंतर्गत बदल्या करण्याचे दिलेले आश्वासन कागदावरच राहिले आहे.
महापालिका मुख्यालयात एकाच कार्यलयात तीन वर्षांपेक्षा जास्त काळ अधिकारी कार्यरत आहेत. याप्रकरणी कोणता अधिकारी किती काळ कोणत्या कार्यालयात कार्यरत आहे, याची माहिती राजेश पाटील यांनी माहिती अधिकारात महापालिका प्रशासनाकडे मागितली होती. मात्र, त्यांना ही माहिती अजूनही देण्यात आलेली नाही. त्यामुळे पाटील यांनी राज्य सरकारच्या वेबपोर्टलवर याविरोधात तक्रार केली आहे.
अधिकारी बदली हा विषय प्रशासनाचा धोरणात्मक निर्णय आहे. बदलीसंदर्भातील प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. त्यावर आयुक्तांकडून कार्यवाही अपेक्षित आहे. महापालिकेत नागरिकांचा जाहीरनामा लावण्यात आला आहे. एखादा अर्ज दिल्यावर तो किती दिवसात निकाली निघाला पाहिजे. त्या अर्जावर कार्यवाही होत नसल्यास ६० दिवसांनंतर संबंधित तक्रारदार अपिलात जाऊ शकतो किंवा त्याला डीम्ड परवानगी मिळाली, असे समजून त्याने ज्यासाठी परवानगी मागितली आहे. ते काम तो परवानगी मिळाली, असे समजून सुरू करू शकतो, असे जाणकारांचे म्हणणे आहे. पदे रिक्त झाली तसेच अधिकारी, कर्मचारी निवृत्त झाल्यावर त्यांच्या जागी सरकारकडून भरती केली जात नाही. तसेच ज्यांना बढती दिली आहे, त्यांनाही चांगले विभाग दिले जात नाहीत. विभागनिहाय बदल्या होणे गरजेचे आहे, त्याकडे सामान्य प्रशासनासह आयुक्तांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पाटील यांनी केला.सात अधिकारी १० वर्षांपासून एकाच ठिकाणीमहापालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांची यादी मोठी आहे. अतिरिक्त आयुक्तांपासून लिपिकांपर्यंत लाच घेण्याची प्रकरणे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून पकडण्यात आलेली आहेत.आस्थापना, लेखा विभाग, करवसुली, नगररचना, पाणीपुरवठा विभागात सात अधिकारी १० वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत आहेत. बेकायदा बांधकाम नियंत्रण विभाग, तर भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे.