ठाणे : मुंब्रा बायपासच्या दुरु स्तीमुळे होणाऱ्या वाहतूककोंडीवर तातडीचा उपाय म्हणून ऐरोली तसेच मुलुंडचे दोन्ही टोलनाके २१ आॅगस्ट ते २३ सप्टेंबर २०१८ या कालावधीत हलक्या वाहनांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. परंतु, आता टोलमाफी नेमकी झाली कोणामुळे, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. राष्टÑवादीसह भाजपाचे राज्यसभेचे खासदार विनय सहस्रबुद्धे हे याचे श्रेय घेण्यासाठी पुढे सरसावले असून आता शिवसेनेनेही टोलमाफीचे श्रेय घेतले आहे. या तीनही आघाडीच्या पक्षांमध्ये टोलमाफीवरून श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे.मुंब्रा बायपासची दुरुस्ती सुरू असल्याने नवी मुंबईकडून येणारी सर्व वाहने ऐरोलीमार्गे मुलुंडहून ठाण्यातील पूर्व द्रुतगती महामार्गाने नाशिक आणि अहमदाबादच्या दिशेने जात आहेत, या दोन ठिकाणांहून येणारी वाहतूकही याचमार्गे नवी मुंबईला जात असल्याने ठाण्यातील रस्त्यांवर आणि विशेषत: टोलनाक्यांवर मोठी वाहतूककोंडी होत आहे. मुंब्रा बायपास १० सप्टेंबरपर्यंत सुरू करण्याचे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत काही दिवसांपूर्वी दिले. मात्र, तातडीचा उपाय म्हणून मुलुंडचे दोन्ही टोलनाके आणि ऐरोली अशा तीन टोलनाक्यांवर हलक्या वाहनांची टोलवसुली बंद करावी, अशी मागणी मागील काही दिवसांत जोर धरत होती. यासाठी सुरुवातीला भाजपाचे राज्यसभेचे खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे मागणी केली होती. त्यानंतर, लागलीच दोन ते तीन दिवसांच्या फरकाने हीच मागणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली.दरम्यान, वाहतूककोंडीतून सुटका व्हावी, यासाठी राष्टÑवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी टोलमुक्ती आंदोलनाचा इशारा रविवारी दिला होता. परंतु, त्याआधीच दोन्ही टोलनाक्यांवर गणेशोत्सवापर्यंत टोल बंद राहील, असे आदेश एमएसआरडीसीने दिले असून, त्यामुळे एकाच टोलनाक्यावर टोल भरण्याची मुभा असल्याचे पत्रक राष्टÑवादीने काढले. त्यानंतर, सोमवारी मंत्रालयात झालेल्या एका बैठकीत २१ आॅगस्ट ते २३ सप्टेंबर या कालावधीत दोन्ही टोलनाक्यांवर एक महिना हलक्या वाहनांना टोलमुक्ती देण्याची घोषणा करण्यात आली. या घोषणेनंतर लागलीच भाजपाचे राज्यसभेचे खासदार सहस्रबुद्धे यांनी आपण केलेल्या पत्रव्यवहारामुळेच टोलमुक्ती मिळाल्याचे स्पष्ट केले. दुसरीकडे राष्टÑवादीने आधीच श्रेय घेतल्याने शिल्लक राहिलेल्या शिवसेनेनेसुद्धा टोलमाफीची घोषणा केली.वास्तविक पाहता एमएसआरडीसीचे खाते एकनाथ शिंदे यांच्याकडे असतानासुद्धा भाजपाने टोलमाफीचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. शिवसेनेने प्रसिद्धिपत्रक काढण्यापूर्वीच भाजपाने प्रसिद्धीपत्रक काढून शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे.
टोलमाफीवरून श्रेयवादाची लढाई; वाहनचालकांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 4:02 AM