ठाणे : गणेशोत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच दिल्ली पोलिसांनी मुंबईतून अतिरेकी ताब्यात घेतल्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी बॉम्ब शोधक, नाशक पथकाच्या मदतीने शहरातील सर्व गणेश विसर्जन घाटांवर गुरुवारी तपासणी केली. तलाव आणि खाडी किनारी होणाऱ्या विसर्जन सोहळ्यावेळी एखादा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ही खबरदारी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुंबईप्रमाणेच ठाणे शहराला विस्तीर्ण खाडीकिनारा मिळाला आहे. सणासुदीच्या दिवसात आशा परिसरात व्रतवैकल्य करण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक एकत्र येतात. याचाच गैरफायदा समाजद्रोहींकडून घेण्याची शक्यता अधिक असते. ठाणे शहरात गणेशोत्सव काळात बाप्पांच्या मूर्तींचे कोपरी विसर्जन, कळवा, विटावा घाट, घोडबंदर घाट, रेतीबंदर विसर्जन घाट, गायमुख विसर्जन घाट, मासुंदा तलाव, उपवन आदी अनेक ठिकाणी विसर्जन केले जाते. विसर्जन सोहळ्याला कोणतेही गालबोट लागणार नाही, याची खबरदारी म्हणून विसर्जन घाटावर श्वान पथकासह गुन्हे अन्वेषण विभागाने सर्व परिसराची तपासणी केली.
यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्तही तैनात केल्याची माहिती सूत्रांनी दिली. घाटावरील निर्माल्य कलश, उभारलेले मंडप, खारफुटीचा काही परिसराची या पथकाने कसून तपासणी केली.
‘गणेशोत्सवाच्या काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी ही तपासणी केली जात आहे. काही संशयित वस्तू आढळल्यास पोलिसांना नागरिकांनी माहिती द्यावी. अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच अफवा पसरवू नये.’
अशोक मोराळे, अतिरिक्त पोलीस आयुक्त, गुन्हे अन्वेषण विभाग, ठाणे शहर