ठाणे : संपूर्ण ठाणे शहरात कोरोनाचा विळखा कमी होत असताना तसेच मुंब्य्रात तर आता शून्य रुग्णसंख्या आढळत आहे. असे असले तरी त्याच्या बाजूच्या भागात म्हणजेच कळव्यात अचानक रुग्णसंख्या वाढत आहे. काही दिवसांपासून कळवा परिसरात १५ च्या आत कोरोना रुग्ण आढळून येत होते, परंतु रविवारी झालेल्या चाचण्यांमध्ये या भागात ३७ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महापालिकेची काहीशी चिंता वाढली आहे.
ठाणे महापालिका कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली होती. शहरामध्ये दररोज १५०० ते १८०० रुग्ण आढळत होते. प्रशासनाने केलेल्या उपाययोजनानंतर शहरात संसर्ग आटोक्यात आला असून आता दररोज १०० ते १२५ रुग्ण आढळत आहेत. दुसऱ्या लाटेमध्ये मोठी गृहसंकुले असलेला घोडबंदर आणि नौपाडा-कोपरी परिसर रुग्णसंख्येत आघाडीवर होता. त्या तुलनेत दाटीवाटीचा परिसर असलेल्या लोकमान्य-सावरकरनगर, वागळे इस्टेट, उथळसर, कळवा, मुंब्रा, दिवा या भागांमध्ये कमी रुग्ण आढळत होते. या सर्वच भागातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या विविध उपाययोजनांचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. या सर्वच भागांमध्ये २० च्या आत रुग्ण आढळत होते. यामुळे कोरोना परिस्थिती आटोक्यात आल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून दिसत असतानाच, कळव्यातील काही भागांमध्ये अचानकपणे रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. काही दिवसांपासून रोज १५ च्या आत रुग्ण आढळणाऱ्या कळवा परिसरात रविवारी ३७ रुग्ण आढळल्याने पालिकेची चिंता वाढली आहे. अचानकपणे हे रुग्ण वाढले कसे याचा अभ्यास आता पालिकेने सुरू केला आहे. ज्या भागात हे रुग्ण वाढताना दिसत आहेत, त्यावर पालिकेने लक्ष केंद्रित केले आहे.