लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यातील ग्रामीण, दुर्गम भागात ४३१ ग्रामपंचायती कार्यरत आहेत. यामधील एक हजार ८१ गावांतील पाण्याचे नमुने जूनमध्ये तपासले आहेत. यात तब्बल ३२ गावांतील व पाड्यांमधील पाणी दूषित आढळले असून, ते पिण्याच्या लायक नसल्याचे उघडकीस आले. या पाण्याचा वापर पिण्यासाठी केल्यास गावकऱ्यांना जलजन्य आजारास तोंड द्यावे लागणार असल्याचे वास्तव ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने निदर्शनास आणून दिले.
पावसाळ्यात जलजन्य आजार होऊ नयेत म्हणून दरवर्षी मे-जून महिन्यात आरोग्य विभागाकडून पाण्याचे नमुने तपासले जातात. यानुसार एप्रिल व जून महिन्यात जिल्ह्यातील तीन हजार २३९ गावातील पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासले आहेत. यापैकी एप्रिलला दोन हजार १५८ आणि जूनमध्ये एक हजार ८१ महिन्यात पाण्याचे नमुने आरोग्य विभागाने घेऊन ते गांभीर्याने तपासले आहेत. यात एप्रिलमध्ये घेतलेल्या ५६ गावांच्या पाणी नमुन्यात २.५९ टक्के पाणी दूषित आढळले आहे, तर जून महिन्याचा गांभीर्याने विचार करता जिल्ह्यातील ३२ गावांमधील पिण्याचे पाणी २.९६ टक्के दूषित आढळले आहे. याकडे ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन तेथील रहिवाशांना जलजन्य आजार होणार नाही, याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. यात भिवंडी तालुक्यातील १३ गावांमधील पिण्याचे पाणी दूषित आहे. या खालोखाल शहापूर तालुक्यातील आठ गावे आणि मुरबाडमधील सात गावांचे पाणी दूषित आढळले आहे. कल्याणच्या एका गावात आणि अंबरनाथ तालुक्यातील तीन गावांतील पाणी दूषित झाले आहे. या दूषित पाण्यामुळे हिवताप, घटसर्प, डायरिया, अतिसार, उलटी, जुलाब, काविळ, डेंग्यू आदी जीवघेणे पावसाळी साथीचे आजार होण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी गावोगावी अतिसार नियंत्रण पंधरवडा उपक्रम हाती घेतला आहे.
....