लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तिसऱ्या लाटेच्या धाेक्याबाबत सावध करीत असताना कल्याण-डोंबिवली शहरात मात्र नागरिकांतील बेफिकिरी वाढल्याचे दिसत आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक आहे. बहुतांश नागरिक विनामास्क बिनदिक्कत फिरत आहेत. गर्दीतही मास्क तोंडावर लावला जात नाही. घटणाऱ्या कोरोना रुग्ण संख्येला पुन्हा वाढायला ही कृती कारणीभूत ठरेल, यात शंका नाही.
नव्याने आढळून येणाऱ्या कोरोनाची रुग्ण संख्या कमी झाल्याने कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. यात खासगी कार्यालये हॉटेल, दुकाने, मॉल, उद्याने, मैदाने खुली करताना कोरोना नियम पाळण्याचे बंधन घातले आहे. मनपा क्षेत्रात नव्याने आढळून येणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या सध्या कमी आहे. मृत्यूचे प्रमाणही एक ते दोन आहे. शनिवारपर्यंतचा आढावा घेता सध्या ४९९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील बहुतांश रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. कोरोना रुग्णांची कमी होत असलेली संख्या हे दिलासादायक असले तरी नागरिक कोरोनाचे नियम पाळत नसल्याचे चित्र बहुतांश ठिकाणी दिसत आहे. मुख्य रस्ते, चौक, बाजारपेठांत नागरिक बिनदिक्कत विनामास्क फिरताना दिसत आहेत. चारचाकी वाहने आणि दुचाकीवरून प्रवास करणारे नागरिक, रिक्षाचालक यांनाही मास्कचे वावडे आहे. कोरोना नियमांना नागरिकांकडून तिलांजली मिळत असल्याने कोरोना विषाणूचे संक्रमण वाढून रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना नियम पाळा, अन्यथा ही बेफिकिरी नडल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही.
-----------------------------------------------
मनपाची कारवाई थंडावली?
कोरोनाची पहिली लाट असो अथवा दुसरी लाट यात मास्क न वापरणाऱ्यांविरोधात केडीएमसी आणि पोलिसांकडून संयुक्त कारवाई सुरू आहे. कोरोनाची घटत चाललेली संख्या पाहता ही कारवाई थंडावल्याचे दिसत आहे. जनआशीर्वाद यात्रेत कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याने कल्याण परिमंडळ ३ मधील विविध पोलीस ठाण्यांमध्ये आयोजक भाजप पदाधिकाऱ्यांवर नुकतेच गुन्हे दाखल झाले. मनपा आणि पोलीसही दुर्लक्ष करीत आहेत. जूनमध्ये विनामास्क १८१२ नागरिकांवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर १ ते ६ जुलै या कालावधीत १८१ जणांवर कारवाई झाली. यानंतर मनपाने दुकाने, बार यांच्याकडे मोर्चा वळविला. ही कारवाई २ ऑगस्टपर्यंत दिसून आली. त्यानंतर कारवाई झाल्याची आकडेवारी मनपाकडून दिली गेलेली नाही. दरम्यान, कारवाई सुरू असल्याचा दावा पथकांकडून केला जात आहे.
------------------------------------------------------
फोटो आहे आनंद मोरे