प्रज्ञा म्हात्रे/लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : बाहेरून बंदिस्त कारागृह पाहिले की, सर्वसामान्यांना या कारागृहाविषयी उत्सुकता वाटू लागते. एकदा तरी आतून कारागृह पाहायला मिळावे, अशी सामान्यांची मनोमनी इच्छा असते. हीच उत्सुकता लक्षात घेऊन ठाणे मध्यवर्ती कारागृह हैदराबाद येथील संगारेड्डी कारागृहाच्या धर्तीवर ‘फील दी जेल’ हा आगळावेगळा उपक्रम राबवत आहे. या उपक्रमामुळे एक दिवस कैदी होण्याची संधी सर्वसामान्यांना मिळणार आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक राजवर्धन सिन्हा यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जात आहे. कारागृह अधीक्षक नितीन वायचळ यांनी दोन महिन्यांपूर्वी या उपक्रमाविषयी माहिती जाणून घेण्यासाठी हैदराबाद येथील संगारेड्डी कारागृहाला भेट दिली. या उपक्रमाची सविस्तर माहिती जाणून घेतली. ठाणे, रत्नागिरी, सावंतवाडी येथील कारागृह ऐतिहासिक असल्याने या तीन ठिकाणी हा उपक्रम राबवण्याचा सिन्हा यांचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमात सर्वसामान्यांना कारागृह पाहता तर येणार आहे. यात त्यांना कैद्यांचे कारागृहातील आयुष्यही समजण्यास मदत होईल. या उपक्रमात त्यांना कैद्यांचे कपडे, बिछाना, ताट-वाटी-पाट, कारागृहातील जेवण दिले जाईल आणि त्यांच्या इच्छेनुसार एक दिवस तुरुंगात बंदिस्त केले जाईल. यासाठी ठराविक शुल्कही कारागृह प्रशासन आकारेल.ठाणे मध्यवर्ती कारागृहातील फाशी यार्डही यावेळी त्यांना दाखवले जाणार आहे. या उपक्रमासाठी वेगळा विभाग केला जाणार आहे. वायचळ यांनी याबाबतचा प्रस्ताव दिला असून परवानगी मिळताच लवकरात लवकर हा उपक्रम राबवला जाईल. तसेच, हा उपक्रम लोकांच्या पसंतीस पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तुम्हीही व्हा, एका दिवसाचे कैदी!
By admin | Published: July 03, 2017 6:30 AM