मुंब्रा : मध्य रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेसाठी राष्ट्रीय महामार्गावर बांधण्यात येणाऱ्या पुलासाठी तुळई उभारण्याचे काम नियोजित वेळेच्या अर्धा तास आधी पूर्ण करण्यात आले. मुंब्र्याजवळील रेतीबंदर परिसरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावर पूल उभारणीसाठी तुळई बसवण्याचे काम शनिवारी रात्री १२ वाजता सुरु करण्यात आले होते. ८० मीटर लांब आणि ११ मीटर उंचीच्या, तसेच ३५५ टन वजनाच्या या लोखंडी पुलासाठी लागणारी तुळई बसवण्याचे काम रविवारी रात्री बारा वाजेपर्यंत पूर्ण होईल, असे नियोजन करण्यात आले होते. परंतु रात्री साडेअकरा वाजताच काम पूर्ण करण्यात आले. त्यामुळे येथील मुख्य रस्ता तसेच बाह्य वळण रस्त्यावरील पर्यायी मार्गाने वळविण्यात आलेली वाहतूक पुन्हा या रस्त्यावरून सुरू केल्याची माहिती मुंब्रा (उपविभाग) वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांनी लोकमतला दिली.
अर्धा तास आधीच पूर्ण झाले पुलासाठी तुळई बसवण्याचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2021 4:44 AM