- कुलदीप घायवट
कल्याण : लॉकडाऊन काळात केशकर्तनालय व्यवसायाचे कंबरडे मोडले. अनलॉकनंतर शहरातील केशकर्तनालयाची दुकाने अटी आणि शर्तीने खुली झाली आहेत. परंतु, सामग्रीच्या खर्चात वाढ झाल्याने दरही वाढले. त्यामुळे दाढीसाठी १०० रुपये आणि कटिंगसाठी १५० रुपये ग्राहकांना मोजावे लागत आहेत.
लॉकडाऊनमध्ये कोलमडलेल्या व्यवसायाला पुन्हा उभारी दिली जात आहे. यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकामधील १०० टक्के केशकर्तनालयाची दुकाने खुली केली आहेत. कटिंग आणि दाढीच्या दरात वाढ झाली असली तरी, कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी नियम अटींचे पालन करताना या व्यवसायातील खर्चही वाढला आहे.
अनेक दुकानात थर्मल स्क्रिनिंग केली जाते. त्यानंतर सॅनिटायझेरने हात धुवून दुकानात प्रवेश दिला जातो. मात्र काही दुकानात याबाबींचा अभाव आहे. लॉकडाऊन काळात घरच्या घरी केस कापण्याचे प्रमाण खूप कमी होते. ग्राहकांचे व्यावसायिकांना फोन येत होते. त्यानंतर व्यावसायिकांनी स्वतःची काळजी घेत नेहमीच्या ग्राहकांचे केस घरी जाऊन कापले, अशी माहिती एका केशकर्तनालयाच्या व्यावसायिकाने दिली.
दुकानांमधील दर
साधे दुकान
कटिंग - पूर्वी ६० रु. / आता ८०-१०० रु.
दाढी - पूर्वी ५५-६० रु. / आता ८०-१०० रु.
लहान मुलांची कटिंग - पूर्वी ८० रु. / आता १००-१२५ रु.
केस काळे करणे - पूर्वी २००-५०० रु. / आता २५०-६०० रु.
वातानुकूलित
कटिंग - पूर्वी ८० रु. / आता १५० रु.
दाढी - पूर्वी ६० रु. / आता ८०-१०० रु.
लहान मुलांची कटिंग - पूर्वी ६० रु. / आता ८०-१०० रु.
केस काळे करणे - पूर्वी २००-६०० रु. / आता ३००- एक हजार रु.
लॉकडाऊन दरम्यान राज्यभरात १७ व्यावसायिकांनी आत्महत्या केली. व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने त्यांच्या कुटूंबियांना आर्थिक मदत करणे आवश्यक आहे. कोरोनाचे नियम पाळत असताना सुरक्षेच्या साधनांचा वापर वाढल्याने खर्चात वाढ झाली आहे.
- अनिल पंडित, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतली जाते काळजी
१) संसर्ग टाळण्यासाठी सलूनमध्ये सॅनिटायझर, सोडियम क्लोराईड, मास्क, डिस्पोजेबल कापड, टॉवेलचा वापर केला जातो.
२) अपॉईंटमेंट घेऊनच ग्राहकाला बोलावले जाते. सेवेनंतर डिस्पोजेबल कापडाची तसेच मास्कची योग्य विल्हेवाट लावली जाते. काही ठिकाणी तात्काळ वापरासाठी मास्कही उपलब्ध आहे. स्वच्छ कापडांचाही वापर होतो.
व्यावसायिकांच्या खर्चात झाली वाढ
केशकर्तनालयाच्या मालकाला पगारावर कारागीर भेटत नाही. दरडोई प्रत्येक सेवेसाठी ५० टक्के कामगार घेतात. २० टक्के खर्च करून मालकाला ३० टक्के मिळतात. तर, मालक स्वतः कारागिरी करत असेल तर त्याला ७०-८० टक्के मिळतात. दरवाढ असली तरी, खर्चही तेवढाच वाढला आहे. कटिंगसाठी वापरले जाणारे डिस्पोजेबल अॅप्रॉन, डिस्पोजेबल टॉवेलच्या किटची किंमत १५ रुपये आहे. स्वच्छतेसह मेन्टेनन्स खर्च वाढला आहे.
शहरात एकूण केश कर्तनालये – २,०००
सध्या सुरू – २,०००