-------------------
३५ हजारांचा मुद्देमाल चोरीला
डोंबिवली : पिसवलीतील भिवा भाने चाळीत राहणाऱ्या रूमनदेवी दुबे यांच्या घराच्या दरवाजाला लावलेली आतली कडी उघडून चोरट्याने घरात प्रवेश करीत लाकडी फळीवरील पेटीमधील सोन्याचे दागिने, रोकड असा ३५ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना सोमवारी पहाटे ४ च्या सुमारास घडली. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
-----------------------
मारहाण आणि दमदाटी
डोंबिवली : विनय राजगोर यांना लोखंडी सळईने हेमल पटेल आणि उत्तम पटेल यांनी मारहाण केली. तसेच विनय यांच्या वडिलांना आणि भावाला दमदाटी करीत शिवीगाळ केल्याची तक्रार विष्णूनगर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. विनय यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी दिलेल्या मालाचे पैसे मागितले असताना पटेल यांनी मारहाण केली. ही घटना सोमवारी सायंकाळी ५.३० ला मोठागाव स्वामी नारायण सिटी येथे घडली. या प्रकरणी हेमल व उत्तम यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे.
-----------------
मोबाइलची चोरी
कल्याण : सीराज मलिक हे घरात हॉलमध्ये झोपले असताना त्यांचा १० हजारांचा मोबाइल चोरीला गेल्याची घटना सोमवारी सकाळी ९.३० च्या दरम्यान पूर्वेतील नांदिवली येथे घडली. या चोरीप्रकरणी हाउसकिपिंगचे काम करणाऱ्या गणेश अय्यर याच्यावर संशय व्यक्त केला आहे. त्याच्याविरोधात दिलेल्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
---------------------------
सोनसाखळी चोरी
कल्याण : पश्चिमेतील मंगेशी रिद्धी सिद्धी बिल्डिंगमध्ये राहणारी स्नेहल गवरे व तिची बहीण अशा दोघी वॉकिंगसाठी जात असताना समोरून दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी स्नेहलच्या गळ्यातील सोन्याची चेन खेचून पलायन केले. ही घटना ३१ मे रोजी रात्री ९.३० ला भोईरवाडी परिसरात घडली. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
---------------------
शाळेत चोरी, संगणक चोरीला
डोंबिवली : कल्याण ग्रामीणमधील निळजे परिसरातील जिल्हा परिषद शाळेत चोरी झाली आहे. या शाळेच्या संगणक कक्षातील सात मॉनिटर आणि एक एलसीडी टीव्ही असा २६ हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. ८ मे ते १४ जूनदरम्यान ही चोरी झाल्याचा अंदाज मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीत व्यक्त केला आहे.
-----------------------