लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: फेसबुकवरील पोस्ट प्रकरणी वर्तकनगर पोलिसांनी अनंत करमुसे यांच्या पत्नी निवेदिता करमुसे यांना पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस बजावल्याने या दाम्पत्याने थेट राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडेच तक्रार केली आहे. आपल्या वैयक्तिक प्रकरणात कुटूंबियांना नाहक ओढण्यात येऊ नये, असेही करमुसे यांनी म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणातील सहावा आरोपी त्याच्या स्कॉर्पिओसह शनिवारी शरण आल्यानंतर त्याला अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.एकीकडे अनंत करमुसे या अभियंत्याला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील निवासस्थानाच्या आवारामध्ये काही कार्यकर्त्यांनी जबर मारहाण केल्याच्या घटनेनंतर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीच आव्हाड यांना मंत्रीमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी केली. तर संबंधित पोलिसांच्या निलंबनाची मागणी ठाण्यातील भाजपचे आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांनी केली. त्यामुळे या प्रकरणाचे चांगलेच राजकीय पडसाद उमटले. तर दुसरीकडे वर्तकनगर पोलिसांनी करमुले यांच्या पत्नीला फेसबुकवरील ती वादग्रस्त पोस्ट काढून टाकल्याप्रकरणी (डिलीट) पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस काढली. त्यामुळे या दाम्पत्याने सोमवारी सकाळी रितसर परवानगी काढून राज्यपाल कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली. या प्रकरणामध्ये नाहक परिवाराला गोवले जाऊ नये. तसेच नि:पक्षपणे चौकशी केली जावी. आम्ही पोलिसांना सर्व प्रकारे सहकार्य करायला तयार आहोत. मग पत्नीला पोलीस ठाण्यात तेही संचारबंदी असतांनाही बोलवायचे कारणच नाही. पोलीस घरी येऊनही चौकशी करु शकतात, असेही करमुसे यांनी सांगितले. यामध्ये योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन राज्यपालांनी दिल्याचे करमुसे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.‘‘ फेसबुकवरील पोस्ट डिलीट केल्याच्या संदर्भात करमुसे यांच्या पत्नीला पोलीस ठाण्यात हजर राहण्याबाबत नोटीस बजावली होती. यात त्यांच्याविरुद्ध कारवाईचा प्रश्नच येत नाही. मारहाण प्रकरणात घटनास्थळावरुन चार लाकडी काठया आणि स्कॉर्पिओ जप्त केली आहे.’’संजय गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वर्तकनगर पोलीस ठाणे.
आव्हाड यांच्या बंगल्यावरील मारहाण: सहावा आरोपी पोलिसांना शरण; करमुसे दाम्पत्याची राज्यपालांकडे तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 9:56 PM
वर्तकनगर पोलिसांनी करमुले यांच्या पत्नीला फेसबुकवरील ती वादग्रस्त पोस्ट काढून टाकल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस काढली. त्यामुळे या दाम्पत्याने सोमवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन याप्रकरणी नि:पक्षपणे चौकशी करण्याची मागणी केली.
ठळक मुद्देलक्ष घालण्याचे राज्यपालांचे आश्वासनस्कॉर्पिओसह पोलिसांनी काठयाही केल्या जप्त