ठाणे : कामावर झोपल्याचा तसेच वेळेवर कामावर येत नसल्याच्या तक्रारीचा जाब विचारल्याने शिवीगाळ करीत ‘तेरे को देखता हूँ’ असा दम देत वॅलेट चालक असलेला सुरक्षा रक्षक राज शेट्टी (३५) याने सरफराज खान (३९, रा. कासारवडवली, ठाणे) या पर्यवेक्षकाला हातातील कड्याने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शेट्टी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांनी गुरुवारी दिली.
वागळे इस्टेट, हाजुरी येथील औरालिस टॉवरच्या दोन इमारती आहेत. या एक आणि दोन टॉवरमध्ये दिवसरात्र मिळून २२ सुरक्षा रक्षक आणि दोन वॅलेट चालक म्हणून काम करतात. १९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास त्यातील एक वॅलेट चालक राज याची तक्रार रात्रीच्या पर्यवेक्षकाने केली. याच तक्रारीची चौकशी करताना २० नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कामावर असताना झोपल्याची आणि कामावर वेळेवर येत नसल्याबाबत खान यांनी जाब विचारला. त्यावर त्याने त्यांनाच शिवीगाळ केली.
शिवीगाळ का करतो, असेच चालू राहिले तर तुला कामावरून काढण्यात येईल, असेही त्याला खान यांनी सुनावले. मात्र, जाब विचारल्याच्या रागातून पुन्हा शिवीगाळ करीत राज याने हातातील कड्याने खान यांच्या तोंडावर जोराने प्रहार केला. यात वरच्या ओठांना जखम झाली. तर दोन दातांनाही मार लागल्याने ते यात जखमी झाले. याप्रकरणी खान यांनी राज याच्याविरुद्ध वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. खान यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केल्याचे वागळे इस्टेट पाेलिसांनी सांगितले.