-----------------------------
सरचिटणीसपदी नियुक्ती
डोंबिवली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधानसभा क्षेत्र डोंबिवली शहर सरचिटणीसपदी अश्वजित काठे यांची नियुक्ती करण्यात आली. डोंबिवली शहरअध्यक्ष सुरेश जोशी यांच्या हस्ते काठे यांना गुरुवारी नियुक्तीपत्र देण्यात आले. या वेळी राष्ट्रवादीचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
-----------------------------
राष्ट्रपूजन व्याख्यान
डोंबिवली : येथील विवेकानंद सेवा मंडळ यांच्या वतीने शनिवारी रात्री ९ वाजता ‘स्वातंत्र्याचे वैज्ञानिक शिल्पकार’ या विषयावर ऑनलाइन व्याख्यान होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक आणि विज्ञान भारती राष्ट्रीय संघटन मंत्री जयंतराव सहस्रबुद्धे हे या वेळी संबोधित करणार आहेत.
-------------------------------
कोरोना निगेटिव्ह दाखल्यावरही परवानगी मिळावी
कल्याण : १५ ऑगस्टपासून सर्वसामान्यांसाठी सुरू होत असलेल्या लोकल ट्रेनमध्ये (आरटीपीसीआर) कोरोना निगेटिव्ह दाखला असणाऱ्या व्यक्तीलाही प्रवास करण्यासाठी परवानगी मिळावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी सचिव नोवेल साळवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. लसीच्या तुटवड्यामुळे बहुतांश नागरिक लसीच्या दुसऱ्या मात्रेपासून वंचित आहेत. परंतु, पोटापाण्यासाठी कामधंदा करावा लागणारच आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.
--------------------------------
दुचाकीची चोरी
कल्याण : पश्चिमेकडील रामदासवाडी येथे राहणाऱ्या जय एखंडे या तरुणाने त्याची दुचाकी सोमवारी दुपारी दोन ते साडेतीन या कालावधीत टाटा पॉवर परिसरातील देशमुख होम्स कमानी रोडलगत उभी केली होती. तेथून ती चोरीला गेली. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-----------------------------------