भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या वतीने मीरा रोड रेल्वे स्थानक परिसराचे सुशोभीकरण होत आहे. पालिकेने सुशोभीकरणासाठी तेथील बांधकामे पाडली. परंतु, बेकायदा फेरीवाल्यांचा वावर असतानाही थातूरमातूर कारवाई केली जाते. काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांच्या आमदार निधीतून मीरा रोड रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील परिसर सुशोभित केला जात आहे. त्यासाठी सुमारे सात कोटींचा निधी मिळणार असल्याने सुशोभीकरणात खाजगी वाहनांच्या पार्किंग व्यवस्थेसह रिक्षातळासाठी जागा निश्चित केली आहे. तत्पूर्वी या रेल्वे स्थानकाबाहेर फेरीवाले व बेकायदा बांधकामांमुळे प्रवाशांसह नागरिकांना येजा करणे जिकिरीचे ठरत होते. त्यातच रिक्षाचालकांची मुजोरी त्रासदायक ठरू लागल्याने पोलिसांच्या स्थानिक वाहतूक शाखेने येथे कायमस्वरूपी चौकी थाटली आहे. या अनावश्यक गर्दीच्या ठिकाणचा परिसर फेरीवालामुक्त तसेच तो सुशोभित करण्यासाठी हुसेन यांनी पालिकेकडे पाठपुरावा सुरू केला. त्यासाठी आमदार निधीतून सात कोटींचा खर्चही देण्याची तयारी त्यांनी दर्शवली. त्यानुसार, पालिकेने २०१४ मध्ये मीरा रोड रेल्वे स्थानक परिसर सुशोभित करण्याचा प्रस्ताव तयार केला. त्याला आघाडीच्या काळात मान्यता देण्यात आली. परंतु, या परिसरात असलेली बेकायदा बांधकामे व फेरीवाल्यांचे बस्तान सुशोभीकरणाच्याआड येऊ लागले. हा परिसर त्यापासून मोकळा करण्यासाठी पालिकेने २०१६ मध्ये धडक कारवाईला सुरुवात केली. अनेक बांधकामे तेथील रस्ता रुंदीकरणासाठी तोडण्यात आली, तर स्थानकाजवळ असलेले स्टॉल व दुकाने हटवण्यात आली. तसेच फेरीवाल्यांचे बस्तान हटवल्यानंतर सुशोभीकरणाच्या कामाला सुरुवात झाली. पालिकेने केलेली कारवाई थातूरमातूर असल्याने पुन्हा फेरीवारीवाले बसू लागले आहेत. (प्रतिनिधी)
सुशोभीकरणामध्ये फेरीवाल्यांचा होतोय अडसर
By admin | Published: February 18, 2017 4:59 AM