मीरारोड - अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या घोडबंदर किल्ल्याच्या संवर्धनाचे , सुशोभीकरणाचे काम ३१ डिसेंबरपूर्वी पूर्ण केले जाईल , अशी ग्वाही पालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी दिली आहे. किल्ल्याच्या सुशोभीकरणाच्या कामाची पाहणी आमदार प्रताप सरनाईकसह पालिका अधिकाऱ्यांनी केली. काम पूर्ण झाल्यावर त्याचे लोकार्पण जानेवारी महिन्यात पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते केले जाईल,असे यावेळी आ. सरनाईक म्हणाले .
घोडबंदर किल्ल्याची झालेली दुरावस्था पाहता त्याचे संवर्धन व या परिसराचे सुशोभीकरण व्हावे यासाठी आमदार झाल्या पासून सरनाईक हे पाठपुरावा करत आहेत . 'महाराष्ट्र वैभव- राज्य संरक्षित स्मारक योजने'अंतर्गत घोडबंदर किल्ला हा मीरा भाईंदर महानगरपालिकेस संगोपनार्थ देण्याचा शासन निर्णय झाला होता. त्यानंतर आवश्यक विविध परवानग्या , जिल्हा नियोजन समितीकडून कामासाठी निधी मिळवून किल्ल्याच्या सुशोभीकरणाचे काम सुरु करण्यात आले होते. काम प्रगतीपथावर असतानाच कोरोनाच्या संकटामुळे काही कामे रखडली आहेत.
घोडबंदर किल्ल्यात सुरु असलेले सुशोभीकरण व नूतनीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी आयुक्तांनी कामाची पाहणी करावी , अशी मागणी आ.सरनाईक यांनी केली होती. त्यानुसार सोमवारी आ. सरनाईक , आयुक्त दिलीप ढोले , विरोधी पक्षनेता नगरसेवक प्रविण पाटील ,गटनेत्या निलम ढवण, नगरसेवक धनेश पाटील, राजू भोईर, विक्रम प्रतापसिंह, संध्या पाटील, वंदना पाटील, तारा घरत, कुसुम गुप्ता सह पदाधिकारी राजु ठाकुर , संदीप पाटील, सुप्रिया घोसाळकर, प्रशांत पालांडे, पप्पू भिसे, श्रेया साळवी, शैलेश पांडे आदी उपस्थित होते.
घोडबंदर किल्ल्यात सुरु असलेल्या कामाची माहिती घेऊन राहिलेली कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. घोडबंदर किल्ल्यात एक मोठा हौद असून त्याठिकाणी 'म्यूजिकल फाउंटन'चे काम सुरु करण्यात येणार आहे. तसेच आतापर्यंत पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनानुसार किल्ल्याची डागडुजी , नूतनीकरण करण्यात आले आहे. किल्ल्यात मोकळ्या जागेत एक छोटे अँपी थिएटर करावे जेणेकरून विद्यार्थी किंवा इतिहास प्रेमी किल्ला पाहण्यासाठी आल्यास त्यांना किल्ल्याची माहिती देता येईल.
किल्ल्याच्या शेजारी असलेल्या जागेत भव्य 'शिवसृष्टी' प्रकल्प मंजूर झाला आहे. शिवसृष्टीसाठी मंजुरी व प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात राज्य सरकारकडून निधीही देण्यात आला आहे. त्यामुळे घोडबंदर किल्ल्यातून शिवसृष्टी प्रकल्पात जाण्यासाठी रस्ता असावा .
किल्ल्याच्या आजूबाजूला गवत , झुडपे वाढली असून ती सर्व काढून त्याठिकाणी फुलझाडे लावून सुशोभीकरण करावे , किल्ल्याच्या परिसराचे झाडे लावून सुशोभीकरण केले जावे अशा सूचना आ. सरनाईक यांनी केल्या. आयुक्तांनी मान्य करीत संबंधित पालिका अधिकाऱ्यांना कार्यवाहीच्या सूचना दिल्या.