मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिकेने शहरातील झाडां भोवती डांबरीकरण व काँक्रीटीकरणाचा फास आवळल्याने झाडांच्या नैसर्गिक वाढीलाच पायबंद बसला आहे. अधिकारी व ठेकेदारांवर कांदळवनाचा ऱ्हास केल्याचे दाखल गुन्हे, वृक्ष तोड व पुनर्रोपण घोटाळा या मुळे पालिका आधीच वादग्रस्त ठरली आहे. त्यातच झाडांच्या डांबरीकरण व काँक्रीटीकरणामुळे शहरातील उरली सुरली हिरवळ देखील अखेरच्या घटका मोजत आहे. महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागा कडुन रस्ते, गटार, फुटपाथ आदि कामे काढली जातात. सदर कामे करताना अडथळा ठरतो म्हणुन आता पर्यंत चांगल्या हिरव्यागार लहान मोठया शेकडो झाडांची तोड पालिकेने केली आहे. शहरातील रस्त्यांची हिरवळ किनार तर जवळपास नष्ट झालेली आहे. नविन लावलेली झाडे देखील जगवली जात नाहीत. जी जगली त्या झाडांची पुर्णपणे वाढ व्हायला देखील वर्षे लागणार आहेत. सीआरझेड, पाणथळ व कांदवळन या कायद्याने प्रतिबंधित असलेल्या क्षेत्रात मीरा भार्इंदर महापालिकेने ठेकेदारांसह कचरा, माती भराव करुन भुखंड व बांधकामे चालवली आहेत. कांदळवनाचा ऱ्हास केल्याप्रकरणी पालिका अधिकारी व ठेकेदार यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झालेले आहेत. झाडांचे पुर्नरोपण देखील फसवे ठरले आहे. झाडांची लागवड, जतन व संरक्षण तसेच देखभाल करण्याची जबाबदारी महापालिकेची असली तरी त्याकडे पालिका दुर्लक्ष करत आहे. (प्रतिनिधी)
काँक्रिटीकरणामुळे झाडांचा श्वास गुदमरतोय
By admin | Published: February 02, 2016 1:50 AM