लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील अधिकाऱ्यांचे पैशांशिवाय एक पानही हलत नाही. त्यांच्या या खाबूगिरीमुळेच कल्याण-डोंबिवली शहरांचे वाटोळे झाले आहे, अशी जळजळीत टीका आमदार गणपत गायकवाड यांनी केली. कल्याण प्रेस क्लबतर्फे बुधवारी झालेल्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी गायकवाड यांनी कल्याण पूर्वेतील समस्या, त्याला जबाबदार असलेली महापालिका प्रशासकीय यंत्रणा, २७ गावांचा प्रश्न, स्मार्ट सिटी आदी प्रमुख विषयांवर परखडपणे आपले विचार मांडले.आरक्षित भूखंडावर झालेली बेकायदा बांधकामे आणि त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकारीवर्गामुळे कल्याण पूर्वेचा विकास होऊ शकला नाही. कल्याण पूर्वेत आयुक्त आणि अधिकाऱ्यांनी केवळ स्वत:चा फायदा कसा होईल, हेच बघितले. आपल्या महापालिकेत एवढे बुद्धिवान अधिकारी आहेत की, त्यांनी चक्क डीपी प्लॅनमध्ये बांधकामांना परवानगी दिली असल्याचा गौप्यस्फोट या वेळी गायकवाड यांनी केला. तर, महापालिका अधिकारी कंत्राटदाराला फायदा कसा होईल आणि त्यातून आपल्याला पैसे कसे सुटतील, याच विचारातून कामे करत आहेत. काही महापालिका अधिकारी खोट्या तक्रारीच्या माध्यमातून दिवसाला ५ ते १० लाख रुपये कमवत असल्याचा गंभीर आरोप करत स्मार्ट सिटी प्रकल्पात कल्याण पूर्वेला पूर्णपणे डावलल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
केडीएमसीच्या खादाड अधिकाऱ्यांमुळेच वाटोळे
By admin | Published: May 11, 2017 1:51 AM