ठाणे : मी लहानसहान विचार करत नाही, मोठी स्वप्ने पाहतो असे प्रधानसेवक नरेंद्र मोदी सरदार सरोवराच्या उद्घाटनप्रसंगी सांगत होते. पण मी चुकाही तशा मोठ्याच करतो, हे त्यांनी सांगितले नाही. पण त्यांच्या अशा चुकांमुळेच भारत देश मागे जातो आहे. तसेही विद्यमान सत्ताधाºयांना आणि नागपुरातून त्यांचा रिमोट हाताळणा-यांना भारताला राज्यघटनापूर्व काळात न्यायचे आहे, अशी परखड टीका ज्येष्ठ साहित्यिका डॉ. प्रज्ञा पवार यांनी केली.कोकण मराठी साहित्य परिषदेचे सहावे ठाणे जिल्हा साहित्य संमेलन रविवारी सहयोग मंदिर येथे रंगले. त्याच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. स्वातंत्र्यपूर्व काळात सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? असा प्रश्न विचारणाºया टिळकांना मंडालेच्या तुरूंगात धाडले गेले. मात्र स्वातंत्र्याला ६७ वर्षे उलटल्यावर आलेल्या हिंदुत्त्ववादी सरकारच्या काळात तर लेखकांना थेट मृत्यूलोकी धाडले जात आहे. या देशात लिहिण्याची कृती केल्यामुळेच डॉ.दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौैरी लंकेश यांच्या हत्या होतात आणि नंतर सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल अर्वाच्च भाषेत टीका केली जाते. त्यामुळे लिहित्या लेखकाच्या शब्दांची धग कुणाला पोळते, जाळते हे वेगळे सांगण्याची गरज नाही. म्हणूनच लेखकाची ताकद संपवण्याचे षड्यंत्र रचले जात आहे, असे स्पष्ट मत त्यांनी मांडले.देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील पहिला घाला आणीबाणीपर्वात म्हणजे इंदिरा गांधी पंतप्रधान असताना घातला गेला होता. पण त्याचे उत्तर भारतातील शहाण्यासुरत्या नागरिकांनी तत्काळ मतपेटीतून दिले. १९७५ ची आणीबाणी तरी घोषित होती. पण गेल्या तीन वर्षांपासन भारतामध्ये अघोषित आणीबाणीचे पर्व सुरू झाले असल्याचा दावा त्यांनी केली.दक्षिण आशियाई देशांतील लहान-मोठे विरोध कधीच गळून पडले आहेत. जसा पाकिस्तान तसा भारत, भारत तसा बांगलादेश, बांगलादेश तसा म्यानमार अशी ही साखळी आहे. या अर्थाने ‘अखंड भारताचे’ स्वप्न पूर्ण झाले आहे. पण त्यात भारतीयत्त्व मात्र हरवून ‘अखंड पाकिस्तान’ निर्माण झाला आहे, अशी भीती पवार यांनी मांडली.
मोदींच्या चुकांमुळेच देशाची पीछेहाट, प्रज्ञा पवार यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:13 AM