कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णांना बेड मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना खाजगी आणि सरकारी रुग्णालयांत बेड मिळवण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. बेड मिळत नसल्याने रुग्णासह रुग्णांचे नातेवाईक धास्तावले आहेत.
डोंबिवलीतील एका रुग्णाला कालपासून बेड उपलब्ध झालेला नाही. कल्याणमधील एका रुग्णाला बेड मिळत नसल्याने त्याच्या मुलाने खाजगी कोविड रुग्णालयात धाव घेतली. तेथेही बेड नसल्यामुळे रुग्णाला अंबरनाथ येथील कोविड सेंटरमध्ये नेण्यात आले. तेथेही रात्री उशिरापर्यंत बेड मिळाला नाही. रुग्ण हा निवृत्त पाेलीस अधिकारी आहे. महापालिकेची सहा कोविड रुग्णालये आहेत, तसेच ६८ खासगी कोविड रुग्णालये आहेत. त्यामध्ये सहा हजारांपेक्षा जास्त बेड आहेत.
साेमवारच्या महापालिकेच्या आकडेवारीनुसार, १६ हजार ६५३ रुग्ण उपचार घेत आहेत. पालिका प्रशासनाच्या मते सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. त्याचबरोबर काही रुग्ण हे होम क्वारंटाइन होऊन उपचार घेत आहेत. साैम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी पालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये जागा आहे. मात्र, खाजगी आणि सरकारी कोविड रुग्णालयांत बेड शिल्लक नाहीत. ऑक्सिजन बेडची उपलब्धता कमी आहे. क्वारंटाइन सेंटरमधील बेड ऑक्सिजन बेडमध्ये रूपांतरित करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. त्याचबरोबर व्हेंटिलेटर बेडचीही गरज भासत आहे. पालिकेकडे केवळ १९० व्हेंटिलेटर बेड आहेत. त्यापैकी एकही बेड रिक्त नाही. सरकारकडून आणखी ५५ व्हेंटिलेटर मिळावेत, अशी मागणी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सरकार दरबारी केली आहे. ५५ व्हेंटिलेटर सरकारकडून प्राप्त झाल्यानंतर व्हेंटिलेटर बेडची क्षमता वाढणार आहे.
आयुक्तांच्या प्रयत्नांनंतर चार रुग्णालयांना ऑक्सिजन
महापालिकेच्या कोविड रुग्णालयात पुरेसा ऑक्सिजन साठा आहे. मात्र, खासगी रुग्णालयात ऑक्सिजनच उपलब्ध नव्हता. रुग्णालयांनी रात्री आयुक्तांना संपर्क साधला असता त्यांनी पहाटे तीन वाजेपर्यंत जागून ऑक्सिजनचा एक टँकर उपलब्ध करून दिला. त्यामुळे चार रुग्णालयांतील ऑक्सिजनची गरज भागली.
‘लक्षणे दिसताच टेस्ट करा’
काही रुग्ण ताप, सर्दी, खोकल्याची लक्षणे दिसून आली तरी ते अंगावर काढतात. परिस्थिती गंभीर झाल्यानंतर उपचारांसाठी धावपळ करतात. लक्षणे दिसताच टेस्ट करावी, तसेच कोविड पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर लगेच बेडचा शोध सुरू करू नये. आजार सौम्य आहे की नाही याची शहानिशा करूनच पुढील प्रक्रिया करावी, असे आवाहन आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.
-----------------