मुरलीधर भवार
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी रुग्णालये आणि आरोग्य यंत्रणा अपुरी असल्याने खासगी रुग्णालयांना उपचार करण्यास कल्याण-डोंबिवली महापालिकेने परवानगी दिली होती. दुसऱ्या लाटेत खासगी रुग्णालयांकडून रुग्णांच्या उपचारापोटी जास्तीची बिले आकारली गेली. ती तपासण्यासाठी नेमलेल्या ऑडिटर्सने त्याची शहानिशा करून प्राप्त तक्रारीनुसार रुग्णांना १८ लाख रुपये परत केले. यामुळे रुग्णांना दिलासा मिळाला आहे.
मात्र, दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन, इंजेक्शनपुरवठा आणि उपलब्ध बेड याचे ऑडिट करणे आवश्यक होते. ते फारसे झाले नाही. केवळ बिलांच्या तक्रारींचा निपटारा केला. महापालिकेने नेमलेल्या ऑडिटर्सव्यतिरिक्त कल्याण तहसीलदारांनीही तीन भरारी पथकांची नेमणूक केली होती. त्यांच्याकडेही इंजेक्शन, ऑक्सिजन आणि बेडवर लक्ष ठेवण्याचे काम दिले होते. मात्र, या पथकांनी काय कामगिरी केली ही बाब समोर आलीच नाही.
पहिल्या कोरोना लाटेच्या वेळी महापालिकेने ३० खासगी रुग्णालये अधिग्रहित केले होती. त्यांनी रुग्णावर उपचार करताना सरकारने ठरवून दिलेल्या दरानुसार उपचार करणे अपेक्षित होते. मात्र, अनेक खासगी रुग्णालयांनी जास्तीची बिले आकारल्याच्या तक्रारी आल्याने महापालिकेने ऑडिटर्स नेमले होते. त्यांनी शहानिशा करून पहिल्या लाटेतील तक्रारींचे निवारण करून जवळपास ६० लाखांपेक्षा जास्त रक्कम रुग्णांना परत केली होती. दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा भयंकर होती. त्यामुळे महापालिकेने ९४ खासगी रुग्णालयांना कोरोना रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी दिली होती. त्यांच्याकडून आकारल्या जाणाऱ्या बिलांवर आणि रुग्णांच्या तक्रारींवर लक्ष ठेवण्यासाठी महापालिकेने ६४ ऑडिटर्स नेमले होते. या ऑडिटर्सनी प्राप्त तक्रारींची शहानिशा करून रुग्णांना १८ लाख रुपये परत केले आहेत.
----------------
चार रुग्णालयांना नोटिसा; एकाचा परवाना रद्द
महापालिकेने ९४ खासगी रुग्णालयांना कोविड रुग्णावर उपचार करण्याची परवानगी दिली होती. दुसऱ्या लाटेची गंभीरता पाहता खासगी रुग्णालये जास्त होती. रुग्णालयांच्या बिल आकारणीविषयी महापालिकेस प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार चार खासगी रुग्णालयांना नोटीस देऊन त्यांच्याकडून समाधानकारक खुलासा प्राप्त न झाल्याने त्यांच्या विरोधात कारवाई केली गेली. एका रुग्णालयाचा परवानचा रद्द करण्यात आला.
---
३६४ रुग्णांना मिळाले परत पैसे
जास्तीचे बिल आकारल्याच्या तीन हजार ४८२ तक्रारी महापालिकेस प्राप्त झाल्या होत्या. ऑडिटर्सने त्याची शहानिशा केली. त्यापैकी ३६४ रुग्णांना जास्तीचे बिल आकारल्याचे उघड झाले. त्यानुसार ऑडिटर्सने जास्तीच्या बिलाची १८ लाख ३८ हजार ९९६ रुपये इतकी रक्कम ३६४ रुग्णांना परत केली.
--------------------
पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत रुग्णांकडून जास्तीचे बिल आकारल्याच्या तक्रारींची संख्या तुलनेने कमी होती. पहिल्या लाटेत अनेक रुग्णालयांचे परवाने रद्द केले होते. त्यामुळे दुसऱ्या लाटेत तक्रारी कमी होत्या. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन, इंजेक्शन, बेड उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी अधिक होत्या.
-सत्यवान उबाळे, मुख्य वित्त व लेखा अधिकारी, केडीएमसी.
----------------
अशी आहे आकडेवारी
कोरोनावर उपचार करणारी शहरातील एकूण खासगी रुग्णालये-९४
नेमण्यात आलेले ऑडिटर्स-६४
बिल जास्त आकारल्याच्या तक्रारींची संख्या- ३४८२
-----------------