ठाणे : जगातील सर्वात मोठ्या मानल्या जाणाऱ्या सहा मॅरेथॉनपैकी रविवारी पार पडलेली शिकागो येथील पाचवी मॅरेथॉन ठाण्यातील सुप्रसिद्ध डॉक्टर महेश बेडेकर यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केली. तीन तास १५ मिनिटे ५८ सेकंदांत ४२.२ किमीचे अंतर पार करून त्यांनी ही मॅरेथॉन पूर्ण केली. विशेष म्हणजे त्यांनी जिंकलेले मेडल स्वामी विवेकानंद यांना समर्पित केले. बॉस्टन येथील सहाव्या मॅरेथॉनमध्ये त्यांची निवड झाली असून २०२० मध्ये ते या मॅरेथॉनमध्ये सहभागी होत आहेत.
रविवारी सकाळी ७.३० वाजता शिकागो शहरातील मिशीजन अॅव्हेन्यू या परिसरातील ग्रॅण्डपार्क येथून ही स्पर्धा सुरू झाली आणि याच ठिकाणी समाप्त झाली. या स्पर्धेत १३० हून अधिक देशांतील जवळपास ४५ हजार स्पर्धक सहभागी झाले होते. ठाण्यातून सहभागी होणारे डॉ. बेडेकर हे एकमेव होते. या स्पर्धेसाठी १३ हजार स्वयंसेवक होते. ती पाहण्यासाठी १.७ मिलियन प्रेक्षक आले होते. ही स्पर्धा पूर्ण झाल्यावर डॉ. बेडेकर यांनी स्वामी विवेकानंद यांनी भाषण केलेल्या फुल्ट्रॉन हॉल येथे जाऊन तिरंगा फडकवला आणि या स्पर्धेत जिंकलेले पदक त्यांनी त्यांना समर्पित केले. बॉस्टन येथील मॅरेथॉनसाठी डॉ. बेडेकर यांनी आतापासूनच सराव करण्यास सुरुवात केली आहे.या मॅरेथॉनसाठी शिकागो हे शहर पूर्ण बंद करण्यात आले होते. स्वामी विवेकानंद यांनी फुल्ट्रॉन हॉल येथे भाषण दिले आणि तिथे जाण्याचे भाग्य मला लाभले, याचा भारतीय म्हणून मला अभिमान वाटत आहे.- डॉ. महेश बेडेकर