बदलापूर, वांगणी परिसरात पावसाळ््यात धबधब्यांच्याखाली भिजण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. हा आनंद अधिक द्विगुणीत करण्यासाठी त्यांचे पावले ढाब्यांकडे वळतात. तेथे आता उघडउघड दारूचे प्याले रिचवायला मिळत असल्याने पर्यटकांसाठी ती पर्वणीच बनली आहे. त्यामुळे सुसंस्कृत बदलापूरमध्ये भविष्यात बारची संख्या वाढत दारूचा महापूर वाहू लागल्यास आश्चर्य वाटायला नको. कटई नाका ते कर्जत या रस्त्याचा महामार्गात समावेश करण्यात आला होता. मात्र बारबंदीनंतर बदलापूरमधील रस्ते पालिकेच्या ताब्यात घेण्यासाठी घाई सुरू झाली आहे. जो रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात होता तो पालिकेच्या ताब्यात देऊन या रस्त्यावरील बारना जीवदान देण्याचे काम करण्यात आले आहे. काटई नाका ते कर्जत या रस्त्यामध्ये केवळ बदलापूरचा तुकडा राज्य महामार्गातून वगळून नवा इतिहास रचला जात आहे. त्यामुळे पुढील काळात बदलापूरमध्ये कोणत्याही रस्त्यावर कितीही मोठा बार उभारून शहरात मद्यसंस्कृती रूजवता येईल. बदलापूर शहरात बारबंदी उठलेली असली तरी बदलापूरची हद्द संपल्यावर पुन्हा ढाबे चालकांचीच चलती आहे. या ठिकाणी दारू पिण्याची मुभा देण्यात येते. बदलापूर ते शेलू या मार्गावर अनेक ढाबे आहेत. त्या ढाब्यांवर दारूची थेट विक्री होत नसली, तरी तेथे बाहेरुन दारू आणून पिण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यात सर्वात पहिला क्रमांक लागतो तो रिलॅक्स फॅमिली गार्डनचा. या ठिकाणी जेवणासोबत दारू पिण्याची सोय उपलब्ध आहे. त्याच्याच पुढे असलेल्या चंदेरी या प्रसिध्द ढाब्यावरही दारू पिण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. या ढाब्यातील जेवण हे बदलापूर परिसरात प्रसिध्द असल्याने तळीराम हमखास येथे वळतात. या सोबत स्वामी धाबा हा देखील जेवणासोबत दारू पिणाऱ्यांसाठी प्रसिध्द झाला आहे. हे हॉटेल महामार्गावर असूनही त्या ठिकाणी दारू पिणाऱ्यांची संख्या जास्त दिसत आहे. या सर्व ढाब्यांवर सर्वाधिक गर्दी असते ती शनिवारी रात्री आणि रविवारी दिवसभर. या परिसरातील धबधब्यांच्या ठिकाणी फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांचीच सर्वाधिक गर्दी या ढाब्यांवर होत असते. अर्थात या ठिकाणी देखील पोलिसांचे संरक्षण असल्यानेच हे सर्व सुरू आहे. वांगणी गावातदेखील ढाब्यांची संख्या कमी नाही. वांगणीत लहान ढाबे आणि चायनीज कॉर्नरवर दारू पिण्यासाठी असंख्य ग्राहक येतात. त्यातल्यात्यात वांगणीतील आदित्य ढाबा हा मात्र दारू पिणाऱ्यांसाठी प्रसिध्द झाला आहे. राज्य महामार्गाला लागूनच हा ढाबा आहे. बारमालकांसाठी रस्ता घेतला ताब्यातबदलापूरमधून जाणारा राज्य महामार्ग राज्य सरकारने पालिकेच्या ठरावाला अधीन राहून पालिकेच्या ताब्यात दिला आहे. सरासरी चार किलोमीटरचा हा रस्ता पालिकेच्या ताब्यात आल्याने त्याच्या देखभाल, दुरूस्तीचा खर्च हा पालिकेला उचलावा लागणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेला राज्य महामार्र्ग पालिकेने ताब्यात घेण्याची कोणतीही गरज नसताना तो रस्ता पालिकेने बारसाठी ताब्यात घेतला आहे. त्याचा फायदा हा पालिकेला कमी तर बारमालकांना जास्त होणार आहे. या रस्त्यावरील बार आणि वाईन शॉप सुरू ठेवण्यासाठी हा रस्ता पालिकेने ताब्यात घेतला आहे. रस्ता ताब्यात घेण्यासाठी पालिकेच्या ठरावाची गरज होती. मात्र तसा ठराव या सहा महिन्यात तरी कधीच झालेला नाही. असे असताना पालिकेने कोणत्या ठरावाच्या अधीन राहून हा रस्ता ताब्यात घेतला हा संशोधनाचा विषय ठरला आहे. कात्रप रस्त्याला महामार्गाचा दर्जा मिळणे गरजेचेबदलापूरमधून जाणाऱ्या दोन प्रमुख मार्गांपैकी एक मार्ग म्हणजे कात्रप रोड. कात्रप परिसरातून जाणारा रस्ता हा जिल्हा मार्ग दाखविण्यात आला आहे. मूळात या रस्त्याचे काम करताना तो रस्ता राज्य महामार्ग असल्याचे भासवत निधी मिळवण्यात आला होता. त्यामुळेच या रस्त्याचे चौपदरीकरण करून रस्ता काँक्रिटचा करण्यात आला. त्यामुळे बेलवलीतील राज्य महामार्र्ग पालिकेने ताब्यात घेऊन बारमालकांना संरक्षण दिले असले तरी किमान कात्रप येथून जाणारा रस्ता हा राज्य महामार्गात वर्ग करण्याची गरज आता व्यक्त होत आहे. मात्र या रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात बार असल्याने या रस्त्यासंदर्भात देखील ठोस निर्णय घेतले जात नसल्याचे समोर येत आहे.
सुसंस्कृत बदलापूरचा बीअर हब करण्याचा घाट
By admin | Published: July 03, 2017 6:09 AM