डोंबिवली : सध्या ठाकुर्ली उड्डाणपुलावरून पूर्वेकडील कानविंदे चौकाकडे येणारी वाहतूक एकदिशा सुरू असल्याने या चौकातून उड्डाणपुलाकडे जाणारी वाहतूक छेडा रोडवरील संभाजी पथावरून सुरू आहे. पण, या मार्गावर खड्डे असल्याने वाहनचालकांची चांगलीच कसरत होत आहे. पावसाचा आलेला अडथळा पाहता तेथील स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेत तात्पुरत्या स्वरूपात का होईना मातीचा भराव टाकून खड्डे भरण्यास सुरुवात केली.
कोपर उड्डाणपूल दुरुस्तीसाठी बंद असल्याने पूर्व-पश्चिमेकडील वाहतूक ठाकुर्ली उड्डाणपुलावरून सुरू आहे. या पुलालगतचे रस्ते अरुंद आहेत, त्यामुळे काही ठिकाणी पी १, पी २ पार्किंग व्यवस्थेबरोबरच नो-पार्किंग आणि एकदिशा मार्ग करण्यात आले आहेत. पूर्वेकडील भागात प्रामुख्याने हे बदल केले आहेत. उड्डाणपुलावरून कानविंदे चौकाकडे वाहतूक एकदिशा करण्यात आली आहे. त्यामुळे उड्डाणपुलाकडे जाणारी वाहतूक छेडा क्रॉस रोड तसेच संभाजी पथ आणि गणपती मंदिर येथून वळवण्यात आली आहे.
परिणामी, या रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. पण, संभाजी पथावरील रस्त्यांवर खड्डे पडल्याने याठिकाणाहून वाहने नेताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. दुचाकीचालकांना खड्ड्यांचा अधिक त्रास होत आहे. आधीच हा रस्ता अत्यंत चिंचोळा आहे. त्यात खड्डे असल्याने याठिकाणी दुचाकींना अपघातही होत आहेत. नुकतीच एक दुचाकी खड्ड्यांमुळे एका बाजूला कलंडल्याची घटना घडली. यात कोणीही जखमी झाले नाही. एकीकडे या मार्गावरून वाहतूक वाढली असताना रस्ता सुस्थितीत आणणे आवश्यक होते. पण, त्याकडे केडीएमसीचे दुर्लक्ष झाले आहे. अखेर, स्थानिकांनीच पुढाकार घेत खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे.