ठाणे : ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालयातील १७७७ दुर्मिळ पुस्तकांच्या डिजिटायझेशनला सुरुवात झाली असून जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते सोमवारी(13 नोव्हेंबर) त्याचे औपचारिक उद्घाटन मराठी ग्रंथ संग्रहालयात करण्यात आले. ग्रंथसंग्रहालयातील उर्वरित सर्व ग्रंथांचेडिजिटायझेशन करणे तसेच या पुस्तकांची दर्जेदार वेबसाइट आदींसाठी देखील जिल्हा प्रशासनातर्फे आर्थिक सहाय्य केले जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
जिल्ह्याच्या नावीन्यपूर्ण उपक्रमातून हा आगळावेगळा उपक्रम जिल्हाधिकाऱ्यांनी हाती घेतला असून त्यांनी पदभार घेताच ग्रंथसंग्रहालयाची ही मागणी मान्य करून ५० लाखाचा निधी तातडीने उपलब्ध करून दिला होता. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ अश्विनी जोशी यांनी यापूर्वी अशा प्रकारे डिजिटायझेशन करण्यास अनुकुलता दर्शविली होती. जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांना निधी हस्तांतरित करुन त्यांच्यामार्फत हा प्रकल्प राबविण्यात येत असून येत्या मार्चपर्यंत तो पूर्ण होणे अपेक्षित आहे.
असे होणार डिजिटायझेशनग्रंथालयात सध्या १७७७ दुर्मिळ पुस्तके उपलब्ध आहेत. दुर्मिळ पुस्तकांची एकूण पृष्ठसंख्या २,९०,७१० आहे. १८ लाख पानांच्या या पुस्तकांमध्ये३४४ काव्याशी संबंधित, २२८ नाटकाची, १९४ इतिहासाची, १७८ निबंधाची, १४९ चरित्र, १४३ कादंबऱ्या, ७७ संकीर्ण, अध्यात्माची ५१,धर्मावर आधारित ५२ तर वैद्यक ५१ तसेच गणितशास्त्राची ४४, पौराणिक ४१, १६ शब्दकोश आदी प्रकारची पुस्तके असून त्यांचे डिजिटायझेशन होणार आहे. १८ लाख पानांचे संपूर्ण डिजिटायझेशन करावे लागणार असून सध्याच्या टप्प्यात सुमारे ३ लाख पानांचे डिजिटायझेशन करण्यात येईल. दररोज सुमारे १० हजार पाने स्कॅन करण्याचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे. नुकतीच या कामाला सुरुवात झाल्याने सध्या वेग कमी असला तरी तो भविष्यात वाढेल, असा विश्वास हे काम करणाऱ्या ईक्युएल कंपनीचे संचालक राहुल गुंजाळ आणि श्रीनिवास कोंगे यांनी सांगितले.
प्रारंभी पुस्तक स्कॅनर समोर पूर्ण उघडे करून ठेवण्यात येते, त्यामुळे उघडलेल्या दोन्ही कागदांचे स्कॅन एकदमच केले जाते. अशा रीतीने स्कॅन झालेल्या संपूर्ण पुस्तकाचा दर्जा तपासून आवश्यक त्या दुरुस्त्या करण्यात येऊन प्रकरणाचे इंडेक्सिंग केले जाते. अंतिम मसुदा पीडीएफ व जेपीजी मध्ये रुपांतरीत करून सर्व्हरवर सेव्ह केला जातो.
सदरहू दुर्मिळ ग्रंथ ऑनलाइनदेखील सहज उपलब्ध राहावेत तसेच जगातील कुठल्याही कोपऱ्यातून ही संपदा महाजालावर सहज शोध घेता यावी व वाचायला मिळावी तरच याचा हेतू साध्य होईल, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ कल्याणकर यांनी केली.
याप्रसंगी जिल्हा नियोजन अधिकारी अमोल खंडारे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री रोकडे, संस्थेचे प्रभारी अध्यक्ष संजीव ब्रह्मे, कार्याध्यक्ष विद्याधर वालावलकर,विश्वस्त दा.कृ.सोमण, चांगदेव काळे, श्री वैती,वासंती वर्तक, शरद अत्रे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.