लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाण्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना मागील काही दिवसांपासून ठाण्यात उन्हाचा पाराही वाढू लागला आहे. गेल्या काही दिवसांतील शहराचे दिवसाचे तापमान ३८ ते ४० अंश सेल्सिअसपर्यंत गेल्याचे दिसून आले आहे. गुरुवारी दुपारी २.३० च्या सुमारास ठाण्याचा पारा ४० अंश सेल्सिअसवर गेल्याने ठाणेकरांच्या अंगाची लाहीलाही होत होती व घामाच्या धारा वाहत होत्या. त्यामुळे अनेकांनी थंड पाण्याबरोबर शीतपेय पिण्याकडे आपला मोर्चा वळवला आहे.मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात तापमानाचा पारा ४० अंशाच्या पुढे गेल्याने ठाण्याचा विदर्भ झाला का, असा भास होऊ लागला आहे. ठाण्यात फेब्रुवारी अखेरपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेची यंत्रणा सतर्क झाली आहे. रोजच्या रोज शहरात १५० ते २०० नवे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे ठाणेकर सुरक्षेच्या दृष्टीने घरात राहणे पसंत करीत आहेत. दुसरीकडे ठाण्याचा पारा वाढल्याने काही ठाणेकर नागरिक घरात गरम होत असल्याने हवा खाण्यासाठी घराबाहेर पडू लागले आहेत. ठाण्यात एप्रिल महिन्याच्या अखेरीस व मे महिन्यात पारा भलताच वाढताना दिसतो. यंदा मार्च महिना सुरू होताच ठाण्याचा पारा ४० अंशाच्या पार जाऊ लागल्याने एप्रिल, मे आणि अर्धा जून या महिन्यांत ठाण्यात काय अवस्था होईल, याची कल्पनाही न केलेली बरे, असे ठाणेकर बोलत आहेत. ठाण्याचा पारा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यंदा फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच शहरातील तापमान ३५ अंशाच्या आसपास होते. फेब्रुवारी महिना संपेपर्यंत तापमानाने ३८ अंशांचा पल्ला पार केला होता. हीच परिस्थिती मार्च महिन्यात कायम आहे. यंदाच्या वर्षी उष्म्यात वाढ होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. तो खरा ठरला आहे. सकाळपासूनच उष्मा जाणवत होता. दुपारी त्यात आणखी वाढ झाली. त्यामुळे उसाचा रस, ज्युस, कोल्ड्रिंक यांच्या मागणीत वाढ झाली. अनेक जण हॉटेल, टपऱ्या येथे जमून थंडगार पेयांचा आस्वाद घेताना दिसत होते.
कोरोनाच्या भीतीमुळे काहींनी थंड पाणी पिणे, थंड पदार्थ खाणे सोडले आहे. परंतु जर उन्हाळा असाच वाढत राहिला तर कोरडा पडलेला घसा थंड करण्याकरिता शीतपेयांखेरीज पर्याय असणार नाही.