ठाणे - धावत्या आणि विज्ञानाच्या जगात माणसाने स्वतःची कार्यक्षमता वाढवली. कामे वेगाने व्हावी यासाठी यंत्र आणि ती निकामी झाली तर त्यांना पर्यायी यंत्र या सर्वांची सोय अगदी चोखपणे केलीे. त्याचप्रमाणे स्वतःच्या शरीरातील निकामी अवयवांना पर्याय त्यास सापडला पण तो त्यास इतकेसे महत्व देत नाही. अवयवदाते आणि त्याची गरज असणारे लोक यांची सांख्यिक माहिती तपासली तर ती फार धक्कादायक आहे. सद्याची गरज पाहता दात्यांची संख्या फार नगण्य आहे. यावर उपाय म्हणून जनजागृती करून अवयवदात्यांची नोंदणी संख्या वाढवणे त्यांना त्याचे महत्व पटवून देणे कायद्यासंदर्भात मार्गदर्शन करणे हे आवश्यक आहे. हे समाजप्रबोधनाचे काम आभा परिवर्तनवादी संघटना करत आहे.
मागील ५ वर्षांपासून संविधान जागृती, पर्यावरण पूरक सण, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व शैक्षणिक मदत इत्यादी कामे संघटना करत आहे. आभा संघटना वर्षभर अवयवदानाच्या जागृतीच्या कामासोबत प्रत्येक वर्षातून दोन वेळा अनुक्रमे मार्च आणि सप्टेंबर महिन्यात अवयवदान नोंदणीचे काम करणार आहे. संकल्प अवयवदानाचा या उपक्रमात नोंदणी मोहिमेचे उद्घाटन नुकतेच के. ई. एम. रुग्णालयाच्या जे. एम. एल. टी. सभागृहात झाले. यावेळी डॉ. कामाक्षी भाटे यांनी अवयवदानाची प्रक्रिया आणि त्याविषयी मार्गदर्शन केले.
त्याचबरोबर मा. अष्टेकर मॅडम यांनी कायदेविषयक माहिती यावेळीं उपस्थितांना दिली. संकल्प अवयवदानाचा उपक्रमाच्या सुरवातीलाच ७५ जणांनी अवयवदाता म्हणून नोंदणी केली. येत्या काळात हा आकडा वाढतच जाईल अशी आशा संघटनेचे अध्यक्ष प्रतीक मोहिते यांनी यावेळीं व्यक्त केली. त्याचबरोबर अवयवदानाच्या नोंदणीसाठी संपर्क करण्याचे आवाहनदेखील यावेळीं संघटनेच्या वतीने करण्यात आले.