ठाणे - प्रारंभ कला अकादमी आयोजित महिला महोत्सवचा पहिला दिवस महिलांच्या विविध गुणदर्शन स्पर्धेने रंगत आहे. या स्पर्धामध्ये 17 ते 70 वयोगटातील महिलांचा समावेश आहे. अकादमीच्या संचालिका डॉ. अरुंधती भालेराव यांच्या पुढाकराने दोन दिवसीय हा महोत्सव सुरु आहे. डॉ. बेडेकर विद्या मंदिर येथे आज सकाळी 8.30 वाजल्यापासून स्पर्धाना सुरुवात झाली. रात्री 8 वाजेपर्यंत या स्पर्धा रंगणार आहेत.
सकाळी महोत्सवच्या पहिल्या दिवसाचे उद्घाटन स्पर्धेतील ज्येष्ठ स्पर्धक अम्मा सुब्रमण्यम यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून झाले. समूह भजन स्पर्धा, सुगम संगीत स्पर्धा, एकपात्री स्पर्धा, समूह नृत्य, गालीचा रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पाककला स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा या स्पर्धानचा यात सहभाग आहे. रविवारी महोत्सवचा दूसरा आणि शेवटचा दिवस गडकरी रंगायतन येथे सकाळी 9 वाजल्यापासुन रंगणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टनगड़ी व अभिनेत्री सुप्रिया पाठारे उपस्थित राहणार आहेत.
मंगला खाडिलकर यांचा मनोमनी कार्यक्रम, अजय पूरकर व सुचिता सामंत यांची मुलाखत, डॉ. मेधा मेहेंदले यांचे आरोग्यविषयक मार्गदर्शन, सौदामिनी पुरस्कार व स्पर्धानचा पारितोषिक वितरण समारंभ या कार्यक्रमानी महिला महोत्सवाचे शेवटचे पुष्प गुंफले जाणार आहे.