उल्हासनगर : शहाड ते पालिका या दीर्घकाळ रखडलेल्या रस्त्याच्या कामाला अखेर ऐन निवडणुकीत सुरूवात झाली आहे. अर्धवट अवस्थेतील या रस्त्यामुळे आतापर्यंत ६ जणांचे बळी गेले आहेत. आताही या कामामुळे चोपडा कोर्ट परिसरात वाहतूक कोंडी होते आहे. हा रस्ता काही महिन्यांतच पूर्ण होईल, अशी प्रतिक्रिया पालिकेकडून देण्यात आली. उल्हासनगरातील १७ कोटींचा पालिका ते शहाड रेल्वे स्टेशन रस्ता दोन वर्षे रखडला आहे. तत्कालीन आयुक्त मनोहर हिरे यांनी ठेकेदाराला नोटीस देवून गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर विद्यमान आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी ठेकेदाराशी चर्चा करून तीन कोटीचा निधी दिला आणि जलदगतीने काम करण्याचे आदेश दिले. हे काम दोन वर्षे रखडल्याने सहा जणांचे बळी गेल्याचा आरोप महासभेत झाला होता. तसेच त्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली होती. अनेक वर्षे बंद असलेले हे काम ऐन निवडणुकीत सुरू झाल्याने तो चर्चेचा विषय बनला. २४ कोटीच्या निधीतून एकूण सहा रस्ते बांधण्याची परवानगी देण्यात आली होती. त्या रस्त्यांचे कामही कागदावरच आहे. चार कोटीच्या निधीतून रस्त्यांची दुरस्ती व खड्डे भरण्याचे काम केले जाईल, असे दाखविले आहे. प्रत्यक्षात त्या रस्त्यांची चाळण झाली आहे. मोर्यानगरी ते व्हिटीसी ग्राऊंडकडे जाणाऱ्या रस्त्याचीही दूरवस्था झाली असून त्या रस्त्यावरही लहान-मोठे अपघात होत आहेत. (प्रतिनिधी)
शहाड रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात
By admin | Published: February 21, 2017 5:37 AM