टिटवाळा : इतिहास नीट न समजून घेता त्याआधारे सध्या जातीधर्माच्या भेदाला तोंड फोडले जात आहे. त्यातून समाजात तेढ निर्माण होत आहे. इतिहास समजून घेतल्यास समाजात वाद होणार नाहीत, असे परखड मत कोकण इतिहास परिषदेच्या नवव्या राष्टÑीय अधिवेशनाच्या अध्यक्ष डॉ. मंजिरी भालेराव यांनी व्यक्त केले.
महापुरुषांवरून सुरू असलेल्या सध्याच्या राजकारणावर त्यांनीही अप्रत्यक्ष टिप्पणी केली. कल्याण तालुक्यातील जीवनदीप संस्थेच्या गोवेली महाविद्यालयात शनिवारपासून दोनदिवसीय अधिवेशनाला सुरुवात झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. कोकण शिक्षण मतदारसंघाचे माजी आमदार रामनाथ मोते, डॉ. धनाजी गुरव, कोकण इतिहास परिषदेचे अध्यक्ष रवींद्र लाड, कल्याण शाखाध्यक्ष जितेंद्र भामरे, जीवनदीप संस्थेचे संस्थापक रवींद्र घोडविंदे, उपजिल्हाधिकारी नितीन महाजन, अश्वमेध प्रतिष्ठानचे अविनाश हरड आदी यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी ज्येष्ठ इतिहास संशोधक अप्पा परब यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
डॉ. भालेराव म्हणाल्या की, जुन्यानव्याची सांगड घालून इतिहासातील सत्य शोधून काढणे, हे इतिहास संशोधकांपुढील सध्याचे मोठे आव्हान आहे. ते पेलण्यासाठी इतिहास अभ्यासकांसह संशोधकांनी पुढे यायला हवे. इतिहासाबाबत अधिक संशोधन व्हायला हवे. त्यातून खऱ्या इतिहासाची समाजासमोर मांडणी झाली पाहिजे. पूर्वजांनी व आधीच्या इतिहासकारांनी काय इतिहासलेखन केले आहे, हे प्रथम जाणून घेतले पाहिजे. ते समजून घेतल्यावर नवे लेखन होणे अपेक्षित आहे. तसे आपल्याकडे होत नसल्याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. इतिहासाची उपयुक्तता सर्वच क्षेत्रांत आहे. शिल्पकला, सिनेमा आणि अगदी कॉम्प्युटर सायन्समध्ये इतिहासाचा वापर होत आहे, असे सांगून या क्षेत्रात बºयाच संधी उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
महाजन म्हणाले की, इतिहास हा विषय आपल्या जीवनाला कलाटणी देणारा आहे. पण, सद्य:स्थितीत इतिहास हा विषय भूतकाळात जमा होत असल्याचे दिसत आहे. तरुणांना हा विषय किचकट वाटत आहे. इतिहासाची कास धरली तर त्यातून तुम्हाला यशस्वी होण्याची प्रेरणा मिळेल. त्यामुळे इतिहास जोपासा, तो समजून घ्या व आपले ध्येय निश्चित करून ते गाठण्याचा प्रयत्न करा. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
पुस्तकखरेदीसाठीही त्यांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान छायाचित्रण, रांगोळी स्पर्धा व माहितीपट स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.इतिहास मनात रुजला पाहिजे : परबइतिहास समजून घेण्यासाठी तो मनात रुजवणे आवश्यक आहे. इतिहासाची खोटी माहिती काही कवी व लेखक समाजात पसरवण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी खरा इतिहास समाजाला सांगावा, असे आवाहन परब यांनी केले.मी अनेक गड-किल्ले फिरलो. त्यांचा अभ्यास केला. ते नवीन पिढीला समजावून सांगितले. त्यावर, एक नवे पुस्तक लिहीत आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी परब यांच्या ‘शिक्के व कट्यारी’ या पुस्तकाचे प्रकाशनही झाले.