ठाणे - विविध मांगण्यासाठी गुरुवार पासून घंटागाडी कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारले होते. परंतु केवळ एकाच दिवसांत हे कामगार कामावर पुन्हा रु जू झाले आहेत. बेमुदत संपाची हाक देणाऱ्या कामगारांनी प्रशासनाच्या कठोर भूमिकेमुळे एका दिवसांतच आपला संप मागे घेतला आहे. आधी कामावर रुजू व्हा अन्यथा पर्यायी व्यवस्था केली जाईल अशी भूमिका पालिका प्रशासनाने घेतली असल्याने अखेर हा संप मागे घेण्यात आला. कामगारांच्या मागण्यांसंदर्भात बुधवारी पालिका उपयुक्तांकडे एक बैठक बोलवण्यात आली असून या बैठकीमध्ये या सर्व मागण्यांवर चर्चा करण्यात येणार आहे. बैठकीपर्यंत संप मागे घेण्यात आला असल्याचा दावा कामगारांच्या वतीने करण्यात आला आहे. विविध प्रकारची थकबाकी, पुढील तीन वर्षाच्या कपडय़ांचे आधीच पैसे कापणे, तीन महिन्यापासून सुरु असलेली पगारात कपात यासह विविध मागण्यांसाठी आणि ठेकेदाराच्या अरेरावीच्या विरोधात २४० घंटागाडी कामगारांनी गुरुवारी सकाळ पासून अचानकपणे काम बंद आंदोलन सुरु केले होते. गुरु वारी सकाळी वर्तक नगर, वागळे आणि माजिवडा मानपाडा प्रभाग समितीत एकही घंटा गाडी फिरकली नाही. त्यामुळे या भागातील नागरीकांना घंटा गाडी न येण्याचा मुद्दाच समजू शकला नाही. प्रत्यक्षात या भागात फिरणाऱ्या २४० घटांगाडीवरील कामगारांनी हे काम बंद आंदोलन पुकारले होते. ठेकेदार एम. कुमार यांच्या अरेरावीचा विरोध करीत या कामगारांनी गुरु वारी एकही गाडी बाहेर काढली नाही. या कामागारांच्या म्हणन्यानुसार २०१८-१९ आणि २० या तीन वर्षाचे ठेकेदाराने कपडय़ांचे पैसे आधीच कापूण घेतले आहे. नियमानुसार ते चुकीचे असून या तीन वर्षाचे कपडे देखील त्याने आगाऊ घ्यावेत अशी नोटीस बजावली आहे. विशेष म्हणजे तीन वर्षाचे पैसे कापूनही हाती पडलेले कपडे केवळ आठ दिवसातच खराब झाले असून त्यांचा दर्जा देखील खालचा आहे. त्यातही तीन वर्षाचे पैसे कापले हे जरी मान्य केले तरी देखील २०१७ मधील देखील पैसे आता का कापले? असा सवाल या कामगारांनी उपस्थित केला आहे. मागील कित्येक वर्षापासूनची थकबाकी अद्यापही देण्यात आलेली नाही, पगार तारखेला होत नाहीत, कमी पगार दिला जातो, काही कामगार कामावर असून सुध्दा त्यांना कामावर नसल्याचे सांगून त्यांना पगारापासून वंचित ठेवले जात आहे. मागील तीन महिन्यापासून ७ हजार २०० रु पये पगारातून कापले जात आहेत, ते कशासाठी कापले जात आहेत, याचे उत्तर देखील मिळत नाही. याबाबत ठेकेदाराकडे विचारणा केली असता त्यांच्याकडून उडवा उडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप या कामगारांनी केला आहे.ठाण्यात सफाईसाठी आणि घंटागाडीवर ठेकेदारांच्या माध्यमातून काम करणाऱ्या कामगारांची संख्या १८०० इतकी आहे. यापैकी ४०० कामगार हे घंटागाडीवर काम करतात. सर्व कंत्राटी कामगार तीन ठेकेदारांमध्ये विभागले गेले असून जे कामगार एम कुमार यांच्याकडे काम करत आहेत अशा २४० कामगारांच्या वतीने हा संप पुकारण्यात आला होत. बुधवार पर्यंत पालिका प्रशासनाची भूमिका स्पष्ट झाली नाही तर पुन्हा एकदा संप पुकारण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे.
ठाणे महापालिका प्रशासनाच्या कठोर भुमिकेमुळे घंटागाडी कामगारांचे बंद आंदोलन मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 5:02 PM
आधी कामावर हजर व्हा अन्यथा दुसरा पर्याय निवडावा लागेल असा इशारा ठाणे महापालिकेने दिल्यानंतर अवघ्या एका दिवसातच घंटागाडी कामगारांनी काम बंद आंदोलन मागे घेतले आहे.
ठळक मुद्देबुधवारी होणार कामगारांच्या प्रश्नावर चर्चामागण्या मान्य न झाल्यास पुन्हा संपाचा इशारा