स्नेहा पावसकर ठाणे : स्वत: अनाथ असूनही कधी त्या गोष्टीचे भांडवल न करता उलट त्यातूनच प्रेरणा घेऊन समाजातील इतर अनाथ मुलांसाठी काम करण्यास पुढे सरसावून त्यांना सक्षम केले आहे, ते विरार येथील विजय सराटे यांनी. निराधार मुलांना दत्तक घेऊन त्यांचे पुनर्वसन करण्याच्या कामात त्यांची पत्नी त्यांना पूर्ण सहकार्य करते. आज त्यांच्या संस्थेत ५६ हून अधिक निराधार मुले राहत आहेत. नारायण चंद्र ट्रस्टच्या माध्यमातून विरार येथे अनाथाश्रम चालवला जातो. विजय सराटे हे त्याचे डायरेक्टर आहेत. १४ वर्षे ते निराधार मुलांचे सर्वतोपरी पुनर्वसन करत आहेत. आज त्यांच्याकडे ६ ते १८ वयोगटांतील मुले-मुली आहेत. त्यांच्या पुढील शिक्षणासाठीही ते इतर संस्थांशी त्यांना जोडून देतात. संस्थेत राहून मोठे झालेल्यांपैकी सुमारे २०-२५ मुले स्वत:च्या पायावर उभी राहिली आहेत.विजय यांनी उच्च शिक्षण घेऊन मास्टर्स आॅफ सोशल वर्क पदवी मिळवलेली आहे. मीना या अनाथ मुलीशीच त्यांनी विवाह केला आणि आज ते दोघेही अनाथ मुलांचे नाथ झाले आहेत. त्यांना दोन मुले असून तीसुद्धा अनाथाश्रमातील इतर मुलांमध्ये मिसळून राहतात. ट्रस्टच्या माध्यमातून महिलांचे वसतिगृह आणि वृद्धाश्रमही चालवला जात आहे. यातून येणाऱ्या मदतीतून मुलांसाठी अनाथाश्रम चालवल जातो. कोरोनाचे संकट उभे ठाकले असताना या सर्व मुलांची काळजी वाटते. परंतु, शाळा नसल्याने मुले अनाथाश्रमाच्या इमारतीतच असतात.बाहेरील व्यक्ती कोणीही तिथे जात नसल्याने मुलांना कोरोनाचा धोका नाही. तरीही, आम्ही वारंवार महापालिकेच्या माध्यमातून तसेच संस्थेच्या खर्चातून आश्रमाच्या इमारतीचे निर्जंतुकीकरण करून घेतो. तसेच कोरोनाबाबतची मुलांच्या मनातील भीती दूर होण्यासाठी विविध खेळ, मनोरंजनात्मक छोटे कार्यक्रम मुलांसाठी तिथेच आयोजित करतो, असे विजय सराटे यांनी सांगितले.>मी स्वत: अनाथ असल्याने देवरूख येथील इंदिराबाई हळबे स्थापित मातृमंदिर या संस्थेतून माझे शिक्षण आणि पुनर्वसन झाले. उच्च शिक्षण घेऊन नोकरी करत असतानाही अनाथ मुलांसाठी काम करण्याचा विचार माझ्या डोक्यात होता. ट्रस्टच्या माध्यमातून मी हे काम करत असून या सर्व मुलांना मी आधार देऊ शकलो, याचे मला आत्मिक समाधान आहे.- विजय सराटे
स्वत: अनाथ असून अनेक मुलांना आधार देत ‘त्यांनी’ केले सक्षम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 12:43 AM