बदलापूर : कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या बीएसयूपी योजनेतील घरांचे वाटप हे अनेक वर्षे रखडलेले आहे. योजनेतील घरे बांधून तयार आहेत, तर लाभार्थ्यांनाही त्यांची गरज आहे. मात्र, लाभार्थ्यांच्या यादीवरून असलेला घोळ सोडवल्यास या घरांचे वाटप शक्य आहे. मात्र, या घरांचे अजूनही वाटप होत नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आहे. तर, पालिकेने लाभार्थ्यांची पहिली यादी निश्चित केली असून त्याला मंजुरी मिळतात, या घरांचे वाटप करण्याची तयारी केली जात आहे. मात्र, उर्वरित लाभार्थ्यांना घरांचा ताबा कधी मिळणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
बीएसयूपीच्या पात्र लाभार्थ्यांना लवकरात लवकर घरकुलांचे वाटप व्हावे, यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात होते. त्यावेळी मुख्याधिकारी प्रकाश बोरसे यांनी ३१ डिसेंबरपर्यंत बीएसयूपी लाभार्थ्यांची पहिली यादी जाहीर करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार, १३ डिसेंबरला नगरपालिकेने बीएसयूपीच्या पात्र लाभार्थ्यांची पहिली प्रारूप यादी जाहीर केली. या प्रारूप यादीमध्ये २२७ लाभार्थ्यांची नावे आहेत. त्यामध्ये संभाजीनगर येथील ५१, नेताजी सुभाषनगर नं. २ येथील १२२, विवेकानंदनगर येथील ४, शास्त्रीनगर येथील २५, रामनगर येथील ११, संजयनगर येथील ४, रोहिदासनगर येथील ८ व शिवाजीनगर येथील २ लाभार्थ्यांचा समावेश आहे. या यादीसंदर्भात हरकती नोंदवण्याचे आवाहन मुख्याधिकाऱ्यांनी केले होते. परंतु, मुदतीत एकही हरकत नोंदवण्यात आली नाही. मुदतीनंतर आलेल्या हरकतींचा विचार न करता नगरपालिका प्रशासन सर्वसाधारण सभेच्या मान्यतेने घरकुलवाटपांसंदर्भात पुढील कार्यवाही करणार आहे. तसेच सर्वेक्षणात नमूद इतर लाभार्थ्यांच्या पुराव्यांची छाननी सुरू असून त्यानुसार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.९०४ घरकुले बांधून तयारकुळगाव-बदलापूर नगरपालिका क्षेत्रात जेएनएनयूआरएमअंतर्गत बीएसयूपी योजनेंतर्गत बदलापूर पूर्वेकडील म्हाडा तसेच सोनिवली येथे मिळून ९०४ घरकुले बांधून तयार आहेत. नगरपालिका हद्दीत बीएसयूपी योजनेला २००६ मध्ये मंजुरी देण्यात आली होती. परंतु, २००९ पर्यंत या कामासाठी साधे सर्वेक्षणही पूर्ण झाले नव्हते. प्रत्यक्ष कामाला २०१० मध्ये सुरुवात झाली होती. त्यामुळे सुरू होण्याआधीच चार वर्षेलांबणीवर पडलेली ही योजना लवकर मार्गी लावून लाभार्थ्यांना घरकुलांचे वाटप होणे अपेक्षित आहे.