डोंबिवली : केंद्र सरकारचे काम जास्तीतजास्त नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जनआशीर्वाद यात्रेचे माध्यम हे खूप प्रभावी आहे, असे मत केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केले. त्यामुळे सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचल्या आहेत की नाही, हे स्पष्ट झाले आहे. नागरिक आभार मानत आहेत, म्हणजे केंद्राचे काम चांगले सुरू असल्याचे ते म्हणाले.
पाटील यांच्या यात्रेला बुधवारी कल्याणच्या दुर्गाडी चौकापासून सुरुवात झाली. यावेळी पाटील, माजी आ. नरेंद्र पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. या यात्रेत आत्मनिर्भर भारत योजना, कौशल्य विकास, प्रधानमंत्री उज्ज्वल योजना, पंतप्रधान जनधन योजना, पीक योजना, कृषी योजना, पंतप्रधान युवा योजना आदी योजनांच्या लाभार्थ्यांची पाटील यांनी चर्चा केली. तसेच या यात्रेत युवकांची बाइक रॅली काढण्यात आली. रस्त्याच्या दुतर्फा नागरिक यात्रेच्या रथावर पुष्पवृष्टी करत होते.
लालचौकी येथे प्रजापिता ब्रह्माकुमारीकडून यात्रेचे स्वागत करण्यात आले. सहजानंद चौकात युवा मोर्चातर्फे स्किल इंडियाच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रवाटप तसेच ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे स्वागत करण्यात आले. शिवाजी चौकात ३७० कलम हटविल्याबद्दल पक्षाचे आभार मानण्यात आले. मुस्लिम, जैन समाज तसेच व्यापारी संघटनेने पाटील यांचा सत्कार केला. आंबेडकर चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून वकील संघटना व हिंदू वाहिनीतर्फे सत्कार करण्यात आला. नेताजी सुभाष चौकात रेल चाइल्ड संस्थेतर्फे स्वागत करण्यात आले. सिंडिकेट येथे मराठा, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय समाज, महिला मोर्चा व गुरुद्वारा समितीतर्फे स्वागत करण्यात आले. तर प्रेम ऑटो येथे डम्पिंग ग्राउंड, वालधुनी नदीबाबत निवेदन देण्यात आले. भाजपा शिक्षक आघाडी, खान्देश समाज, सिंधी समाज व आगरी कोळी उत्कर्ष मंडळातर्फे स्वागत व सत्कार करण्यात आले.
------------------