सुरेश लोखंडे
ठाणे : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री ‘उज्ज्वला’ गॅस योजनेद्वारे मिळणारा गॅस मोफत मिळत नाही. सद्य:स्थितील तब्बल ८१९ रुपयांस गॅस सिलिंडर मिळत आहे. एवढी मोठी रक्कम खर्च करणे या कुटुंबीयांना आता शक्य नाही. त्यामुळे या योजनेच्या जिल्ह्यातील ४४ हजार १५२ महिला लाभार्थी गॅसऐवजी चुलीकडे वळल्या आहेत.
जिल्ह्यातील शहरी व आदिवासी, दुर्गम भागातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबीयांतील महिलांना केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री ‘उज्ज्वला’ गॅस योजनेद्वारे एलपीजी गॅसचे कनेक्शन मोफत देण्यात आले. त्यासोबत काही रक्कम घेऊन शेगडीही दिली. मात्र, दरमहा गॅस सिलिंडर मोफत देण्याचे नियोजन केले नाही. त्यामुळे दरमहा वाढणाऱ्या गॅसच्या किमतीला या गरीब कुटुंबीयांना नाहक तोंड द्यावे लागत आहे. रोजगार हमीच्या कामावर जाणाऱ्या या कुटुंबीयांना २३८ रुपये मजुरी मिळत आहे. त्यात घराचा खर्च करीत असतानाच या गॅससाठी ८१९ रुपये भरणे आता त्यांच्या आवाक्याबाहेर गेले. सर्वच ठिकाणी जीव घेणारी महागाई आता गरिबांच्या मुळावरच उठली आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या परिवारास सावरण्यासाठी जिल्ह्यातील या ४४ हजार १५२ महिलांनी महागडे गॅस सिलिंडर घेण्याएवेजी पारंपरिक पद्धतीच्या चुलीवर स्वयंपाक करण्यास प्रारंभ केला आहे. यामुळे ही याेजनात अडचणीत सापडली आहे.
सिलिंडर घेणे परवडत नाही
गॅस सिलिंडरवर मिळणाऱ्या अनुदानाची रक्कम बँक खात्यावर जमा झालेली नाही. या योजनेमार्फत केवळ १०० रुपयांना शेगडी व गॅस सिलिंडर मिळाले. मात्र, आज ही योजना बारगळली असून यासाठी गॅस सिलिंडर ज्या किमतीला सर्वसामान्यांना मिळतो त्याच किमतीला तो दारिद्य्ररेषेखालील कुटुंबांना मिळत असल्यामुळे तीव्र संताप आहे. गॅसची किंमत कमी करून भरीव अनुदानाची रक्कम शासनाने पुन्हा बँक खात्यात जमा करावी. - साखर पाखरे, उल्हासनगरगेल्या चार वर्षापूर्वी पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस सिलिंडर देण्यात आले. मात्र, गॅस सिलिंडर घेणे परवडत नसल्याने ते बंद केले आहे. सध्या लाकडेच जमा करून चुलीवर स्वयंपाक सुरू केले आहे. - दिलीप जाधव, बिरवाडी
आम्ही मजुरी करणारी माणसे आहोत. त्यामुळे एकदम सातशे, आठशे रुपये गॅस सिलिंडरच्या टाकीसाठी खर्च करणे आम्हाला शक्य नाही. आम्ही तिचा वापर करणे बंद केले आहे. - दत्ता मुकणे, भातसानगर
चुलीवर स्वयंपाक करणे आमच्यासाठी योग्य आहे. सिलिंडरचा भावही अधिक असल्यामुळे गॅस विकत घेणे आवाक्याबाहेर झाले आहे. महागडे सिलिंडर गरिबांना परवडत नाही. - यशवंत हिलम, ग्रामस्थ
nएक वर्षापूर्वी गॅसच्या वाढीव किमतीवर सर्वांनाच २५ ते ६० रुपयांपर्यंत सबसिडीची रक्कम बँकेत जमा होत असे. परंतु, आता गॅस सबसिडी अनुदान रक्कमही एक वर्षापासून बंद झाली आहे. nत्यातच आता सिलिंडरची मनमानी वाढलेली किंमत मोजावी लागत आहे. त्यामुळे या गरिबांसह सर्वसामान्य परिवाराचे आर्थिक गणित कोलमडले आहे. सबसिडीची रक्कम बंद करण्याची मनमानी सुरू असतानाच या उज्ज्वला गॅस योजनेचे कनेक्शनही सप्टेंबर २०१९ पासून बंद केले आहे.n यामुळे सप्टेंबर ते ऑगस्ट २०२० दरम्यान कनेक्शनही देण्यात आले नाही. एकीकडे या योजनेच्या अनुदानाची रक्कम बंद करून योजनाही बंद करीत गॅस सिलिंडरची किंमत वाढविण्यात येत असल्यामुळे गृहिणींमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. nजिल्ह्यात उज्ज्वला गॅसचे ६० हजार २८३ कनेक्शन देण्याचे उद्दिष्ट ठरवले हाेते. मात्र यापैकी संपूर्ण जिल्हाभरात ४४ हजार १५२ गॅस कनेक्शनचेच लक्ष्य गाठण्यात यश प्रशासनास आले आहे. n या याेजनेपासून अनेक कुटुंबे वंचित राहिली हाेती. मात्र, आता सिलिंडरच महागल्यामुळे या याेजनेच्या लाभार्थ्यांनीही पुन्हा सिलिंडर खरेदी न करण्याचा निर्णय घेतल्याने या याेजनेचे भवितव्यच संकटात सापडले आहे.