ठाणे : कोरोनामुळे एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या एक हजार ४६ मुलांची नोंद झाली आहे. त्यापैकी २८३ बालकांना बालसंगोपन योजनेचे आदेश देण्यात आले आहेत. उर्वरित बालकांपर्यंत पोचून त्यांना तातडीने मदत करावी, असे आवाहन उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे यांनी गुरुवारी झालेल्या कृती समितीच्या चौथ्या बैठकीत केले.
अनाथ झालेल्या मुलांच्या शिक्षणासाठी जीएम फाउंडेशन या सेवाभावी संस्थेमार्फतही मदत करण्यात येत आहे. आतापर्यंत ६६ बालकांच्या माहितीचे प्रस्ताव तयार आहेत. ही मदत संबंधित बालकांपर्यंत पोहोचावी, यासाठी शिक्षण विभागाने त्या मुलांच्या शाळांशी समन्वय साधावा, असे निर्देशही त्यांनी दिले.
वेळी जिल्ह्यातील दोन्ही पालक गमावलेल्या तन्वी गांधी या बालिकेस ठोंबरे यांच्या हस्ते अनाथ प्रमाणपत्र देण्यात आले. कुमारी तन्वी हिला प्रधानमंत्री केअर योजनेतून व राज्य शासनाच्या वतीनेही आर्थिक मदत देण्यात आली. तिला दरमहा एक हजार १२५ रुपयांची मदत देण्यात येणार आहेत. याशिवाय अंगणवाडी सेविका ज्योत्स्ना जयवंत भोईर यांचे कर्तव्य बजावत असताना कोरोनाने निधन झाले. त्यांच्या वारसांना शासनाच्या सानुग्रह अनुदानाचा पन्नास लाख रुपयांचा धनादेश ठोंबरे यांच्या हस्ते देण्यात आला आहे.